शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) या शिंदे गट आणि भाजपावर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. विविध मुद्द्यांवरून निशाणा साधत आहेत. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "सुषमा अंधारे तुम्ही तुमचं आडनाव बदलून सुषमा आगलावे करा" असा खोचक टोला लगावला आहे. तसेच "स्वतःच्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करण्यासाठी आगलावेपणा करणं हे बरं नव्हे" असं देखील म्हटलं आहे.
भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "सुषमा अंधारे यांना माझी विनंती हात जोडून आहे. गेल्या काही दिवसांपासून तुमची वक्तव्य, कर्तृत्व आणि तुमची भाषणं हे संपूर्ण महाराष्ट्र ऐकतोय आणि ते सर्व ऐकल्यानंतर आम्ही विनंती करतो की, तुम्ही तुमचं आडनाव सुषमा अंधारे ऐवजी बदलून आता सुषमा आगलावे करा" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
"स्वतःच्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करणं हे बरं नव्हे"
"स्वतःच्या पक्षाची वाताहत झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करण्यासाठी आगलावेपणा करणं हे बरं नव्हे" असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. "बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं आम्ही लुटलं आणि त्यांना मानवंदना दिली आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणारे आम्ही शस्त्र, अस्त्र हे बरोबर घेऊन जात नसतो. त्यांच्याकडून विचारांचं शस्त्र घेत असतो एवढं संजय राऊतांनी लक्षात ठेवावं" असंही सांगितलं.
शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मतिस्थळी शुद्धीकरण करण्यात आलं. यावरुनही शेलारांनी खोचक टोला लगावला. "एखाद्या स्मृती स्थळावर जाऊन वंदन करणारी मराठी माणसं ते ही मंत्री यांच्याबाबत शुद्धीकरण करण्याचा अशुद्ध विचार आपल्या मनात का रुजला हा प्रश्न आहे" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"