एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचीही ताकद वाढताना दिसत आहे. दुसरीकडे पडलेल्या भगदाडातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. याच दरम्यान आता भाजपाने शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच देशाची आर्थिक राजधानी मुंबई आर्थिकदृष्ट्या बलवान होणार! आमचं ठरलंय! असंही म्हटलं आहे.
"पब, पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जाते असे ध्वनिप्रदूषण करण्याची नशाच चढलेय" असं म्हणत शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "देशातील सर्वात जुने विशेष आर्थिक क्षेत्र असलेल्या अंधेरीच्या सिप्झमध्ये भारत सरकारकडून 200 कोटी खर्च करुन विशेष केंद्रीकृत सुविधा (सीएफसी) उभारण्यात येत असून 5 लाख रोजगार आणि 30 हजार कोटींच्या निर्यातीचे उदिष्ट ठेवण्यात आलेय.नुकतीच त्याची पायाभरणी झाली" असं शेलार यांनी म्हटलं आहे.
"बीकेसीत भूमिगत बुलेट ट्रेन टर्मिनस त्यावर आयएफएससी उभे राहणार. सोबत 7 मेट्रो धावू लागतील. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आर्थिकदृष्ट्या बलवान होणार!आमचं ठरलंय! पण पब, पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जाते, असे ध्वनिप्रदूषण करण्याची नशाच चढलेय!" असं देखील आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी देखील आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.