अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतरांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांसह ९ दिग्गज नेते सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. भाजपा-शिवसेना सरकारमध्ये सहभागी होण्याचा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय आहे असा दावा शरद पवारांनी केला आहे तर राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच आम्ही सत्तेत सहभागी झालोय असं अजित पवारांनी म्हटलं. मात्र या राजकीय नाट्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच दरम्यान भाजपानेउद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीकास्त्र सोडलं आहे.
"अहंकारी राजा, पुत्र विलासी, दिमतीला ठेवला शापित दरबारी, अवतार शकुनीचा नाम मात्र "संजय" धारी" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. "बघा काय अवकळा आली, गेली गेली सत्ता गेली, पक्ष ही गेला अहंकारी राजा, विलासी पुत्र आणि संजय तेवढा उरला" असं म्हणत निशाणा साधला आहे.
आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. अहंकारी राजा आणि पुत्र विलासी, दिमतीला ठेवला शापित दरबारी, अवतार शकुनीचा नाम मात्र "संजय" धारी, अहंकारी राजाला आवडे खोटी स्तुती भारी, संजय मग बिनधास्त दुसऱ्याचे बाप काढी काय ती रोज सुरु असायची सरबराई! बघा काय अवकळा आली, गेली गेली सत्ता गेली, पक्ष ही गेला, अहंकारी राजा, विलासी पुत्र आणि संजय तेवढा उरला"
"झाला मोह "जाणत्या राजांना" याच संजयाचा, अखेर बसला फटका त्यांनाही शापित दरबाऱ्याचा, आम्ही सांगतं होतो वारंवार यांना आवरा कि हो, या तुमच्या विश्वविख्यातांना, आता बांधा पुतळा या तुमच्या विश्वविख्यातांचा, यापेक्षा काय सन्मान करणार या शापित दरबाऱ्यांचा!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या"
मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनासमोर एका महाराष्ट्रसैनिकाने बॅनरबाजी केली आहे. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असून राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असं आवाहन या बॅनरमधून केले आहे. दादर परिसरातील लक्ष्मण पाटील या कार्यकर्त्याने हा बॅनर लावला आहे. त्यावर लिहिलंय की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला, राजसाहेब-उद्धवसाहेब आता तरी एकत्र या, संपूर्ण महाराष्ट्र आपली वाट पाहतोय. एका महाराष्ट्रसैनिकाची हात जोडून कळकळीची विनंती असा मजकूर छापण्यात आला आहे.