अजित पवारांनी फडणवीस-शिंदे सरकारशी हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली असली, तरीही महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम ठेवण्याचा निर्धार काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या बैठका मंगळवारी झाल्या. त्यात दोन्ही पक्षांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय घेत महाविकास आघाडी अधिक मजबूत करण्याचा संकल्पही केला. याच दरम्यान भाजपाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला आहे.
"ज्यांनी काढला आमचा बाप, तेच उरले आज एक फुल दो हाफ" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "अहंकारी राजा आणि विलासी पुत्र एक विश्वविख्यात दरबारात... नॅनोत मावेल एवढेच उरले पदरात! ज्यांनी काढला आमचा बाप तेच उरले आज एक फुल दो हाफ!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आशिष शेलार यांनी य़ाआधीही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "अहंकारी राजा आणि पुत्र विलासी, दिमतीला ठेवला शापित दरबारी, अवतार शकुनीचा नाम मात्र "संजय" धारी, अहंकारी राजाला आवडे खोटी स्तुती भारी, संजय मग बिनधास्त दुसऱ्याचे बाप काढी काय ती रोज सुरु असायची सरबराई! बघा काय अवकळा आली, गेली गेली सत्ता गेली, पक्ष ही गेला, अहंकारी राजा, विलासी पुत्र आणि संजय तेवढा उरला"
"झाला मोह "जाणत्या राजांना" याच संजयाचा, अखेर बसला फटका त्यांनाही शापित दरबाऱ्याचा, आम्ही सांगतं होतो वारंवार यांना आवरा कि हो, या तुमच्या विश्वविख्यातांना, आता बांधा पुतळा या तुमच्या विश्वविख्यातांचा, यापेक्षा काय सन्मान करणार या शापित दरबाऱ्यांचा!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.