प्रचारसभांसाठी शिवाजी पार्कच्या मैदानासाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने यासाठी अर्ज केले. शिवसेनेच्या ठाकरे गटाने १७ मे रोजीच्या प्रचारसभेसाठी अर्ज केल्याचे समजते. महापालिकेच्या जी-दक्षिण विभाग कार्यालयाकडे एकूण सहा अर्ज आल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान शिवाजी पार्कवरून भाजपाने ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे.
"ऐतिहासिक शिवतीर्थ तर "मावळ्यां"चे पालिकेने का पुरवावे डोहाळे या "डोम कावळ्यां"चे?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "उबाठा गटाला पुन्हा एकदा इंडिया आघाडी नावाचा "दहा तोंडी रावण" छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उभा करुन हिंदू "शक्तीला" पराभव करण्याचे ऐलान करायचे आहे काय?" असा सवाल विचारला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"लोकसभेची लढाई यावेळी "देव-देश-धर्मासाठी" आहे. त्यामुळे हिंदू "शक्तीचा" पराभव करण्यासाठी निघालेल्या अधर्मवादी "शक्तींना".. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे आमचे दादरचे ऐतिहासिक मैदान हवे कशाला? उबाठा गटाला पुन्हा एकदा इंडिया आघाडी नावाचा "दहा तोंडी रावण" छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उभा करुन हिंदू "शक्तीला" पराभव करण्याचे ऐलान करायचे आहे काय?"
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांकडे पुरावे मागणाऱ्यांना...स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना ...हे मैदान देऊ नये...! ऐतिहासिक शिवतीर्थ तर "मावळ्यां"चे पालिकेने का पुरवावे डोहाळे या "डोम कावळ्यां"चे?" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मनसेने गुढीपाडवा मेळाव्यासाठी अर्ज केला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने अजून तरी शिवाजी पार्कसाठी अर्ज केला नसल्याचे समजते.
शिवाजी पार्कसाठी सध्या तरी सहा अर्ज आले आहेत. जागावाटप झाल्यानंतर उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर राजकीय पक्षांकडून आणखी अर्ज येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या एकत्रित सभा होतील. त्यामुळे त्यांच्याकडून आणखी तारखांसाठी अर्ज येऊ शकतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजून अर्ज केलेला नाही, अशी माहिती आहे. बहुधा ठाकरे गटाला १७ मे रोजी मैदान मिळाल्यास याच दिवशी महाविकास आघाडीची एकत्रित सभा शिवाजी पार्कवर होईल, अशी शक्यता आहे.