मुंबईतील महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या किनारी रस्ता प्रकल्पातील (कोस्टल रोड) वरळी ते मरीन ड्राइव्ह या एका मार्गिकेचं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी राज्याचा मुख्यमंत्री असूनही बोलवण्यात आलं नव्हतं, उद्धव ठाकरेंनी रातोरात भूमिपूजन करुन टाकलं अशी खंत बोलून दाखवली.
भाजपाने यावरूनच आता उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे. "देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मेहनत केली. तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात भूमिपूजनाला त्यांना बोलावले नाही. पण अखेर उद्घाटनाच्या कोनशिलेवर देवेंद्र फडणवीस यांचेच नाव कोरले गेले. जे मोठ्या मनाने वागतात त्यांच्याच नावाच्या कोनशिला चौकाचौकात लागतात" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"ठाकरे सरकारच्या काळात भ्रष्टाचार, वसुलीमुळे प्रकल्प रखडला, प्रकल्पाचा दर्जाच धोक्यात आला. बरे झाले ठाकरे सरकार गेले... अडवणूक, वसूली थांबली... युतीचे सरकार आले आणि प्रकल्पाचे काम वेगाने पुर्ण झाले. आज मुंबईकरांचे स्वप्न पुर्ण झाले! मुंबईला गतिमान करणाऱ्या... मुंबईकरांच्या "कोस्टल रोडचा" पहिला टप्पा आज खुला झाला."
"हा प्रकल्प व्हावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात प्रचंड मेहनत केली, पण तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात भूमिपूजनाला त्यांना बोलावले नाही. पण अखेर उद्घाटनाच्या कोनशिलेवर देवेंद्र फडणवीस यांचेच नाव कोरले गेले.जे मोठ्या मनाने वागतात त्यांच्याच नावाच्या कोनशिला चौकाचौकात लागतात!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं गेलं नव्हतं
भाजपा-सेना युतीत २०१८ सालीच खटका उडाला होता. कोस्टल रोडच्या भूमिपूजनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे भाजपामध्ये नाराजी निर्माण झाली होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे भाजपच्या इतर नेत्यांनीदेखील या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांना निमंत्रण देण्यात आले होते. परंतु पक्षातील वरिष्ठांनी या कार्यक्रमाला कोणीही न जाण्याचे आदेश दिल्याने ते या कार्यक्रमासाठी उपस्थित नव्हते.