दसरा मेळाव्यामधून शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला मजबूत सरकारची आवश्यता असल्याचे बोलून दाखवले होते. मात्र गेल्या 9 वर्षांपासून पाशवी बहुमत असलेल्या सरकारचा आपण अनुभव घेतलाय. आता असं एकपक्षीय बहुमत असलेलं सरकार नको. कारण खुर्ची डळमळीत असते तेव्हा देश मजबूत होतो, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला भाजपाने देखील उत्तर दिलं आहे. "शिवतीर्थावर पुर्वी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची तोफ धडाडायची!!! आता... "काँग्रेसी हृदयसम्राट" बालिशसाहेबांचे आपटीबार फुटतात!" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरात वाटले ते खरे विचारांचे सोने! शिवसैनिकांचा खरा भरगच्च मेळावा आझाद मैदानात महाराष्ट्राने पाहिला!!शिवतीर्थावर पुर्वी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची तोफ धडाडायची !!!आता... "काँग्रेसी हृदयसम्राट" बालिशसाहेबांचे आपटीबार फुटतात! मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐकेरी उल्लेख केलात, त्यावरुन तुमची पातळी दिसली. सोबत पंतप्रधानांनी भ्रष्टाचार, घराणेशाहीच्या विरोधात दिलेला काढ्याचा असर झालाय हेही सगळ्यांना कळले!! हल्ली मळमळ, उलट्या, अपचन यांचे करपट ढेकरांना हे विचारांचे सोने म्हणतात!!" असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
"महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची जास्त चिंता"
भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. "उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर काँग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. खरं तर हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीचे गोडवे गावे लागत आहेत. नरेंद्र मोदीजींचं कर्तृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं आहे. पण उद्धव ठाकरे त्यांच्यावर टीका करत आहेत. खरं तर ती त्यांची पात्रता नाही."
"संपूर्ण देश मोदीजींचं कुटुंब आहे पण ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी‘ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते कळणार नाही. उद्धव ठाकरे शिवतीर्थावर बोलताना हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबद्दल बोलतील असं वाटलं होतं पण ते मूग गिळून गप्प बसले. कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केल्याबद्दल ते आज तरूणांची माफी मागतील, असं वाटलं पण त्यांना महाराष्ट्रातील तरूणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची जास्त चिंता वाटत आहे" असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.