निवडणूक आयोगाने मोठा निर्णय देत शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये पहिलीच सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपासह शिंदे गटावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, आजपर्यंत जे जे शक्य होईल ते त्यांना दिलं. तरीदेखील आज ते सगळे खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तरीदेखील तुम्ही आज माझ्यासोबत आला आहात. आज मी तुम्हाला मागायला आलोय. तुमचे आशीर्वाद अन् साथ पाहिजे. जे भुरटे, चोर, गद्दार, तोतया आहेत, ते शिवसेना नाव चोरू शकता, पण शिवेसेना नाही चोरू शकत. धनुष्यबाण चोरला असाल, पण तो तुम्हाला पेलवणार नाही. जिथे रावण उताणा पडला, तिथे हे मिंध्ये काय उभे राहणार, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) टीकेला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "मोदींचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मतं मिळवली, गद्दारी केली तेच आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात?" असा सवाल विचारला आहे. तसेच "कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
"मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मते मिळवली आणि नंतर गद्दारी केली. तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात? कोकणात शिमगा असल्याने जनता फारसे गांभीर्याने घेणार नाही. कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले. आधे इधर गए... आधे उधर गए.. अकेले "असरानी" बचगएं आता महाराष्ट्रात "असरानी" जिथे जिथे फिरतील तिथे तुफान मनोरंजन होणार..!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे मला पाहा आणि..."; खेडमधील सभेवरून भाजपाचा खोचक टोला
भाजपाने "कालचं उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे ‘मला पाहा फुल वाहा’" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. तसेच "दुनिया सगळी वाईट... माझं बरोबर मीच चांगला हेच ठाकरेंच धोरण" असंही म्हटलं आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कालचं उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे ‘मला पाहा फुल वाहा’ लोकप्रतिनिधी वाईट कारण ते सोडून गेले. निवडणूक आयोग वाईट कारण त्यांनी निकाल दिला. आमदारकीसाठी मदत केली पण भाजपा वाईट. न्यायालयाने विरोधात निकाल दिला की त्यांच्यावर दबाव. दुनिया सगळी वाईट... माझं बरोबर मीच चांगला हेच ठाकरेंच धोरण" असं म्हणत केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"