उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि राहुल नार्वेकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी कायदेतज्ज्ञांसह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते. "नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये यावं आणि तिथं सांगावं शिवसेना कुणाची? मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा, गाडावा की तुडवावा" असं म्हणत थेट आव्हान दिलं. याला आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
"जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर!! जय श्रीराम!!" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "दुर्योधन आणि शकुनी मामाच्या धोका आणि "महा" कपटामुळेच "महा"भारताचे युध्द झाले. म्हणून पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा "महा"नाश झाला."
"नेहमी एक खोटं लपवण्यासाठी "महा" खोटे बोलावे लागते! मुख्यमंत्रिपदासाठी "महा"कपट, "महा"धोका केला नसता... अडीच वर्षे... असं काही ठरलं नसताना ही "महा"खोटं बोलला नसता... रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या "महा" शकुनीला आवरले असते... तर अशी "महा" पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती. जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर!! जय श्रीराम!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी "शिवसेना जर तुम्ही विकली असाल तर मी जिथे जिथे जातो, तिथे तिथे शिवसैनिक माझ्यासोबत कसे?, राज्यपालांना विनंती करतो, एक अधिवेशन पुन्हा बोलवा आणि मिंध्यांना सांगतो, विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा. मी तुम्हाला पाठिंबा देतो. हाकला त्यांना... व्हीपचा अर्थ आहे चाबूक... चाबूक लाचारांच्या हातात शोभत नाही. शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या हातात शोभतो" असं म्हणत महापत्रकार परिषदेतून निशाणा साधला होता. त्याला आता भाजपाने उत्तर दिलं आहे.