उद्धव ठाकरे हे १ व २ फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे जिल्ह्यात ठिकठिकाणी जनसंवाद मेळावा घेत जनतेसोबत संवाद साधणार आहेत. ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त शिवसैनिकांमध्ये उत्साह पसरला असून दौऱ्याची शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे. याच दरम्यान भाजपाने उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला आहे.
"रायगडचा झंझावाती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का?" असा खोचक सवाल भाजपाने विचारला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाकडे पुरावे मागणारे उबाठा गटाचे प्रमुख आपल्या अस्तित्वाच्या जुन्या खूणा शोधण्यासाठी रायगड दौरा करीत आहेत..."
"बातमी आलेय की, उद्धव ठाकरे यांचे रायगडमध्ये स्वागत मुंबईतील मराठी मुस्लिम सेवा संघाचे शिलेदार करणार आहेत...! उत्तम... अतिउत्तम...! मुंबईतील मालवणी, बेहरामपाडा, महमद अली रोड आणि मुंब्रा येथील तुमच्या सगळ्या शिलेदारांना सोबतच घेऊन जा!"
"जमलेच तर.. दाऊदच्या मालमत्तांचा नुकताच लिलाव झालाय, रत्नागिरीत जाऊन त्याची पण आस्थेने पाहणी करुन या! रायगडचा झंझावाती दौरा गाड्यांवर हिरवे झेंडे लावून होणार का? या दौऱ्याला तमाम कोकणवासीयांनी शुभेच्छा द्याव्या का?" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने या दौऱ्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आपल्या दौऱ्यात १ फेब्रुवारी रोजी पेण, अलिबाग, रोहा येथे जनसंवाद मेळावा घेणार आहेत. तर २ फेब्रुवारी रोजी म्हसळा, माणगाव, महाड येथे जनसंवाद मेळावा घेणार आहेत.