अयोध्येत राम मंदिराचा संकल्प पूर्ण झाला. २२ जानेवारी २०२४ रोजी अत्यंत शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने भारतासह अवघे जग राममय झाले. रामनामाचा जयघोष मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील काळाराम मंदिर येथे जाऊन पूजा आणि महाआरती करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
भाजपानेउद्धव ठाकरेंवर यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. "ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का?" असा खोचक सवाल विचारला आहे. तसेच "आज जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा... उबाठा शाखा अंधारात आणि गोदातिरावर थयथयाट. जो न रहा राम का, वो न किसी काम का!" असंही म्हटलं आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"भगवान श्री काळारामासमोर आज उभे असलेल्या सन्मानीय ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल... पंढरपूरात जाऊन ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या पायाला हात लावले नाहीत, ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा खंडित केली, लालबागच्या राजावर पण बंदी आणली, रामभक्तांच्या रक्ताने हात माखलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी सोबत मैत्री केली, रथ यात्रा अडवणारे लालूप्रसाद यादव ज्यांच्यासाठी प्रिय व्यक्ती ठरली."
"राम काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेची फळे चाखली, अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का? आज जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा... उबाठा शाखा अंधारात आणि गोदातिरावर थयथयाट. जो न रहा राम का, वो न किसी काम का!" असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.