ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते हे सातत्याने शिंदे-फडणवीस सरकार आणि भाजपावर टीका करत आहेत. विविध मुद्द्यांवरून निशाणा साधत आहेत. याच दरम्यान आता भाजपाने या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन उबाठाला थेट विचारतोय... काँग्रेस की हिंदुत्व?, कबर की स्मारक? आणि औरंगजेब की सावरकर?" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "मर्द, खंजीर असले शब्द न वापरता उबाठा प्रमुखांनी स्पष्ट शब्दात सांगावे यापैकी नेमके काय?" असंही म्हटलं आहे.
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन उबाठाला थेट विचारतोय... ◆ औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर? ◆ उस्मानाबाद की धाराशिव? ◆ अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यानगर? ◆ काँग्रेस की हिंदुत्व? ◆ कबर की स्मारक? आणि ◆ औरंगजेब की सावरकर? म्हणून शब्दांची कोटी न करता.. मर्द, खंजीर... असले शब्द न वापरता... उबाठा प्रमुखांनी महाराष्ट्राला स्पष्ट शब्दात सांगावे... यापैकी नेमके काय? कि दोन्ही? नाही तर लहानपणीचा खेळ... एवढं एवढं पाणी आणि गोलगोल "गाणी"" असं शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
१ जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात महापालिकेवर विराट मोर्चा
मुंबई महापालिका विसर्जित झालीय, १ वर्ष झाले, पावसाप्रमाणे निवडणुका लांबत चाललेत, निवडणुका घेण्याची हिंमत बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. लोकांची कामे होत नाहीत, पैसा उधळला जातोय त्याला जाब विचारायला कुणीच नाही. महापालिका असताना लोकप्रतिनिधी असतात. स्थायी समितीत चर्चा होते त्यानंतर कामे दिली जातात. परंतु रस्त्याच्या नावाने, जी-२० नावाने सध्या वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. मुंबईला सध्या मायबाप राहिले नाही. लुटालूट सुरू आहे. या महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी जाब विचारण्यासाठी येत्या १ जुलै शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते आदित्य ठाकरे करतील अशी माहिती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
"मुंबईकरांच्या मनातील असंतोषाचे प्रतिक म्हणून मोर्चा"
उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकांच्या मनात खदखद आहे. एकेकाळी मुंबई महापालिका साडे सहा कोटी त्रुटीत होती. परंतु शिवसेनेच्या हाती महापालिका आल्यानंतर ९२ हजार कोटी ठेवीपर्यंत तिजोरी भरली. आमच्या कारभाराने त्यात भर पडली. ठेवींमधूनच कोस्टल रोड आणि जनतेच्या उपयोगी कामे, योजना महापालिका पार पाडत होती. आता बेधडकपणे महापालिकेचा पैसा वापरला जातोय. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास ७-९ हजार कोटी रुपये या ठेवींमधून आतापर्यंत वापरण्यात आला आहे. हा जनतेचा पैसा आहे. या पैशाची लूट त्याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. त्यासाठी १ जुलैला मुंबई महापालिकेवर हा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईकरांच्या मनातील असंतोषाचे प्रतिक म्हणून हा मोर्चा असेल असंही त्यांनी म्हटलं.