“हा कोरोनाचा ED व्हेरियंट”; सोनिया गांधींसह काँग्रेस नेते पॉझिटिव्ह आल्यावर भाजपचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 12:33 PM2022-06-03T12:33:42+5:302022-06-03T12:33:57+5:30
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
मुंबई: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची लाट नियंत्रणात आल्याचे दिसत होते. मात्र, आता देशभरातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास पुन्हा एकदा देश निर्बंधांकडे जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव प्रियांका गांधी यांच्यासह अन्य काही काँग्रेस नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता यावरून भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंगप्रकरणी समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले असून, राहुल गांधी यांना १३ किंवा १४ जून रोजी पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. ईडीचे समन्स येताच सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
हा कोरोनाचा ED व्हेरियंट
हा तर कोरोनाचा ईडी व्हेरियंट आहे, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. दुसरीकडे, सोनिया गांधी यांच्यानंतर प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. खुद्द प्रियांका गांधी यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. तर, सोनिया आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीने चौकशीसाठीची नोटीस धाडली आहे. येत्या ८ जून रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. पण आता सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चौकशीसाठी त्या उपस्थित राहणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, सोनिया गांधी यांना कोरोनाच लागण झाल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. सोनिया गांधी गेल्या काही दिवसांत ज्या नेत्यांना भेटल्या होत्या त्यातील काही नेते देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याचेही सुरजेवाला यांनी सांगितले. सुरजेवाला यांना दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांना गुरुवारी सौम्य स्वरुपाचा ताप आला. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.