Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आली आहे. या यात्रेला अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले जात आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान घेण्यात येणाऱ्या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे आदित्य ठाकरे सहभागी होत आहेत. यावरून भाजपकडून आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ६३ दिवस, ६ राज्ये व २७ जिल्ह्यातून ही पदयात्रा मार्गक्रमण करत पदयात्रेचे अर्धे अंतर पार केलेले आहे. लोकांमध्ये राहुल गांधी यांच्या पदयात्रेबद्दल मोठा उत्साह दिसून येत आहे. काँग्रेसचे समर्थकच नाही तर विरोधकही या पदयात्रेला पाठिंबा देत आहेत, असा विश्वास काँग्रेसकडून व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे या पदयात्रेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
तैनाती फौजेला मालकासमोर परेड करावीच लागते
अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून, राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेत उद्या आदित्य ठाकरे सहभागी होणार. बुडत्याला गांधीचा आधार. Begger has no choice. तैनाती फौजेला मालकासमोर परेड करावीच लागते, असे ट्विट करत भातखळकर यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.
दरम्यान, ही पदयात्रा वेगाने व जनतेच्या मोठ्या प्रतिसादाने पुढे जात आहे. जनतेचा, लोकांचा सहभाग वाढत असून आता ही लोकचळवळ झाली आहे. भारत जोडो यात्रा निघाल्यापासून भारतीय जनता पक्ष टीका करत गैरसमज पसरवण्याचे काम करत आहे पण त्याकडे फारसे लक्ष देण्याचे गरज नाही. ‘भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो’ असा प्रतिटोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. पदयात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. राहुल गांधी या पदयात्रेच्या माध्यमातून जनतेच्या भावना समजून घेत आहेत. ही मुव्हमेंट आहे इव्हेंट नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"