मुंबई: केंद्र सरकारनेअग्निपथ योजना (Agneepath Scheme) जाहीर केल्यानंतर देशातील अनेक राज्यात तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या योजनेला विरोध केला आहे. त्यानंतर, आता काँग्रेसचे बिहारमधील काँग्रेस नेते कन्हैय्या कुमारनेही या योजनेला विरोध करत केंद्र सरकावर निशाणा साधला. ही योजना लागू करण्यापूर्वी केंद्र सरकारने देशातील तरुणांशी संवाद साधला का, विरोधी पक्षांशी चर्चा केली का, असा सवाल कन्हैय्याने विचारला आहे. कन्हैय्या कुमारने केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.
युवकांना सरकारने ४ वर्षाचे लॉलिपॉप दाखवले आहे. पण, बिहारमधील बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. सैन्यात भरती नसेल तर येथील युवकांचे लग्न होत नाहीत. या योजनेनुसार एखादा तरुण ४ वर्षे देशसेवा केल्यानंतर निवृत्त होऊन २१ व्या वर्षी घरी येईल, तेव्हा लग्नासाठी त्याला मुलगी कोण देईल, त्याच्याशी लग्न कोण करेल?, असा सवाल कन्हैय्याने विचारला आहे. यावर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी कन्हैय्या कुमारवर पलटवार केला आहे.
मग अग्निविरांच्या पंचायती तुला कशाला?
अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करत कन्हैय्या कुमारवर खोचक शब्दांत टीका केली आहे. JNU मध्ये १०/१२ वर्षे शिक्षण घेऊनही अजून तुला कोणी मुलगी का दिली नाही? मग अग्निविरांच्या पंचायती तुला कशाला? अशी विचारणा अतुल भातखळकर यांनी केली आहे. दुसरीकडे, भाजप नेते या योजनेचे जोरदार समर्थन करत आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनीही आपली भूमिका मांडली आहे. राहुल गांधींच्या ट्विटमुळे कुठली योजना मागे होत नाही, त्यामुळे त्यांच्या ट्विटला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. देशाच्या हितासाठीच अग्निपथ योजना तयार केली आहे. देशातील तरुण योग्य मार्गावर जाईल, त्याच्या मनात देशाप्रति एक जज्बा तयार व्हावा, एक शिस्त निर्माण व्हावी आणि ज्या युवकांना करिअर म्हणून सैन्यात भरती व्हायचंय त्यांनी करिअर म्हणून भरती व्हावं. ज्यांना जीवनातील काही वर्षे देशसेवेसाठी खर्ची करायची आहेत, त्यांनी तशी सेवा करावी, असे फडणवीसांनी म्हटले आहे.
दरम्यान, अग्निपथ योजनेविरोधात आंदोलकांनी चार दिवसांत ७०० कोटींची संपत्ती भस्मसात केल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय रेल्वेचे ६० डबे, ११ इंजिनांना आगी लावण्यात आल्या. याबरोबरच अनेक मालमत्तांनाही आगी लावल्या. जेवढ्या किमतीची मालमत्ता जाळली, त्यात बिहारला १० नवीन रेल्वे मिळू शकल्या असत्या.