भाजपाने पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “खोके बंद झाल्यावर बाप लेक सैरभैर झालेत. मातोश्री ३ च्या प्लॅनचे काय होणारं ही चिंता सतावते आहे” असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच “उठा उठा सकाळ झाली. बालिश आरोप करण्याची वेळ झाली...” असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “वसूली आणि टक्केवारी, वाझेची तरफदारी करण्यात इतके बिझी होते की बाकी उद्योगाकडे पाहायला वेळ मिळाला नाही. खोके बंद झाल्यावर बाप लेक सैरभैर झालेत. मातोश्री ३ च्या प्लानचे काय होणारं ही चिंता सतावते आहे. राहुलजींशी चर्चा करून काही दिवस थायलँडमध्ये जाऊन या…” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
“उठा उठा सकाळ झाली, बालिश आरोप करण्याची वेळ झाली”
“युवराज Big Boss च्या तयारीत दिसतायत… उठा उठा सकाळ झाली, बालिश आरोप करण्याची वेळ झाली...” असं म्हणत अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. भाजपा नेते राम कदम (BJP Ram Kadam) यांनी एअरबस आणि वेदांता फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांची नार्कोटेस्ट करावी, अशी मागणी केली आहे. तसेच नार्को टेस्टने सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील असंही म्हटलं आहे. राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "एअरबस आणि वेदांता फॉक्सकॉनवर खोटं बोलणाऱ्या प्रमुख सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा. वेदांता फॉक्सकॉनच्या टीमने तळेगावला जागा फायनल करून सुद्धा त्यांना इतर राज्यात का जावे लागले?"
"नार्को टेस्टने सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील”
"त्यांच्याकडून कोणी आणि किती टक्केवारी, कमिशन मागितले? कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मीटिंग झाली? मीटिंगला कोण कोण उपस्थित होते? वेदांताने जागा फायनल करून सुद्धा त्यांच्यासोबत MOU का केला नाही? कंपनीच्या प्रमुख लोकांना भेटण्यास टाळाटाळ का? आणि कोणाच्या सांगण्यावरून केली? नेमक हेच कारण एअरबसच्या बाबतीत सुद्धा आहे का? नार्को टेस्टने सर्व गुपित आणि वसुलीच्या कहाण्या समोर येतील" असं राम कदम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.