राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरींवर (NCP Amol Mitkari) आता गंभीर आरोप झाले आहेत. हे आरोप एखाद्या विरोधकांकडून नव्हे तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून हा आरोप झाल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. अमोल मिटकरी यांच्यावर कमिशनखोरी त्याचसोबत महिलांची प्रकरणं दडपण्याचा आरोप करण्यात आला आहे. अकोल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी मिटकरींवर हे आरोप केले आहेत. मोहोड म्हणाले की, मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि पक्षशिस्त मला माहिती आहे. त्यामुळे मी कुठल्याही वृत्तपत्र अथवा जाहीरपणे आरोप केले नाही. मी प्रदेशाध्यक्षांकडे सगळे आरोप केले. ही व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमात व्हायरल झाली.
अमोल मिटकरींवरील गंभीर आरोपावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. "स्त्री सन्मानावरून जगाला ज्ञानामृत पाजणाऱ्या सुप्रिया सुळे आणि रूपाली चाकणकर आहेत तरी कुठे?" असा खोचक सवाल विचारला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अकोला राष्ट्रवादीतील वादाचा तिसरा अंक; मिटकरींचे एका महिलेच्या प्रकरणातील व्हिडीओ आपल्याकडे असल्याचा जिल्हाध्यक्षांचा दावा. स्त्री सन्मानावरून अवघ्या जगाला ज्ञानामृत पाजणाऱ्या सुप्रिया ताई सुळे आणि रूपालीताई चाकणकर आहेत तरी कुठे?" असा सवाल भातखळकर यांनी विचारला आहे.
NCP आमदार अमोल मिटकरींवर गंभीर आरोप
मोहोड यांनी या व्हिडिओ क्लिपनंतर पत्रकारांनी मला प्रश्न विचारले. तरीही मी शांत होतो. मात्र आमदारांनी माझ्या चारित्र्यावर आरोप लावला. माझ्या चारित्र्यावर आमदारांनी आरोप लावावेत? आमदारांना मी काय दिले आणि काय नाही याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी किती पैसे दिले वैगेरे हा विषय जाऊद्या असं म्हटलं आहे. परंतु माझ्या चारित्र्यावर जे प्रश्न निर्माण केला सगळ्यात आधी आमदारांनी स्वत:चं चारित्र्य पाहावं. यांचे पात्रुडचं महिला प्रकरण आजही गाजत आहे. मुख्य नेत्यांना महिला जाऊन भेटत आहे. या प्रकारावर पडदा पडला नाही तोवर दुसरी एक महिला काँग्रेस पदाधिकारी जिला १० लाख रुपये देऊन प्रकरण मिटवण्यात आले ते काय प्रकरण होते अमोल मिटकरींना विचारा.
पक्षांतर्गत वाद चिघळला
तिसरं प्रकरण, आचारसंहिता सुरू असताना पुण्यातील एक महिला पदाधिकारी अकोल्याच्या रेस्टहाऊसवर ३ दिवस मुक्कामी कशी? ते प्रकरण काय आहे विचारा. आमदार स्वत:ला गरीब म्हणतात आणि ८० लाखांचा प्लॉट घेतात तेही अकोल्यातील उच्चभ्रू वस्तीत. गरीब कसे? ३० लाखांची कार घेऊन फिरतात हे पैसे कुठून आले? असा सवाल करण्यात आला आहे. आमदार मिटकरींनी माझ्यावर जे आरोप लावले त्यातील एक पुरावा देऊन दाखवावा मी भरचौकात फाशी घेईन. पुरावे दिले नाही तर येणाऱ्या १० दिवसांत मी मिटकरींच्या घराबाहेर बसून पत्रकार परिषद घेईन त्यात आमदारांनी काय काय केले त्याचे पुरावे सादर करेन असा इशारा शिवा मोहोड यांनी दिला.
अकोला जिल्ह्यातील पात्रुडचं तालुक्यातील महिला प्रकरण खूप गाजलं. त्यातील आमदाराने पाया पडतानाचे फुटेज आहे. ते मी बाहेर काढेन. अमोल मिटकरींचे अनेक प्रकरणे आहेत. १० दिवसांनी मी सर्वांसमोर मांडेन. एका महिलेला १० लाख रुपये देऊन प्रकरण मिटवतो मग याच्याकडे पैसा किती आहे? याची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी केली आहे. लोकांना नाव ठेवतो परंतु स्वत: आरशात पाहायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते तर अमोल मिटकरींचा ५० वेळा चौरंगा केला असता. इतकी महिला प्रकरणं अमोल मिटकरींची आहेत. १० दिवस माझ्यावरील आरोपांबाबत मिटकरी काय पुरावे देतात हे पाहणार त्यानंतर ११ व्या दिवशी मी मिटकरींच्या घरासमोर सगळ्यांच्या समक्ष पुरावे सादर करेन असा इशारा शिवा मोहोड यांनी दिला.