राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी लोकशाही मार्गाने निवडून येत सत्ता मिळवता येत नसल्याचे पाहून महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा आदी राज्यातील नॉन भाजपा सरकारमधील लोकांना फोडून, त्यांना आमिष देऊन, सीबीआय, ईडी आदी यंत्रणांचा वापर करून सत्ता उलथवून टाकली जात आहे. हा संसदीय लोकशाहीवरील हल्ला आहे असं म्हटलं आहे. तसेच केंद्रातील सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी २०१४च्या निवडणुकीत अच्छे दिनची घोषणा केली होती. पण अच्छे दिनचे चित्र देशातील नागरिकांना आजपर्यंतही जाणवत नाही असं म्हणत भाजपावर निशाणा साधला. यानंतर आता भाजपाने राष्ट्रवादीला खोचक टोला लगावला आहे.
"वसुलीचा छंद जुना, राष्ट्रवादी पुन्हा" असं म्हणत भाजपा नेत्याने जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पवार मात्र लवासा, आयपीएल, इफ्तार पार्ट्या, भ्रष्टाचारी-दाऊद टोळीवाल्यांची वकिली अशा लोकोपयोगी कामात सतत गुंतलेले असतात... वसुलीचा छंद जुना, राष्ट्रवादी पुन्हा..." असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
शरद पवार यांनी गुजरात, आसाम या दोन राज्यातील सत्ता वगळता त्यांना लोकांनी सत्तेवर येऊ दिले नाही. लोकशाही मार्गाने निवडून येत सत्ता मिळवता येत नसल्यामुळे भाजपाने देशातील नॉन बीजेपी सरकार हटवण्यासाठी यंत्रणांचा वापर केला आहे. याप्रमाणेच राज्यातील उद्धव ठाकरे सरकार पडले असून त्यांच्याशी सुसंगत संवाद नसलेल्या राजकीय नेत्यांनाही त्यांनी त्या कारणाखाली अडकूवन तुरूंगात टाकले. यासाठी त्यांनी अनिल देशमुख यांच्या घरांवर, नातेवाईकांवर टाकलेल्या धाडींसह नवाब मलिक, संजय राऊत यांचे उदाहरणेही यावेळी दिले.
देशातील भाजपा सरकारच्या विरोधात समविचारी पक्षांना एकत्र करून त्याविरोधात जनमत एकत्र करण्याच्या काळात गुलाम नबी यांनी काँग्रेस पक्ष सोडला. पण हे चांगले झाले नाही. पार्लमेंटमधील ते माझे चांगले सहकारी आहे. ते भाजपाच्या भूमिकेविरोधात सतत आघाडीवर राहिलेले आहे. पण पक्ष सोडून जाण्यासाठी त्यांना काय संकट आले हे माहित नसल्याचे पवार यांनी पत्रकारांना सांगितले. याशिवाय राज्यात कोणावर कधी धाड पडणार, कधी जेलमध्ये जाणार हे भाजपच्या काही लोकांना कसे कळते यावरून काही तरी गडबड असल्याचेही त्यांनी सांगितले. रोहीत पवारांविषयी विचारलेल्या प्रश्नास अनुसरून त्यांनी भाजपात भविष्यवाणी वर्तवणार गट तयार झाल्याचे सांगितले.