'हर हर महादेव' हा छत्रपती शिवाजी महाराजांवरील आधारित चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाला आता काहींना विरोध केला. ठाण्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉल येथे जाऊन आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत चित्रपटाचा शो बंद पडला. यावेळी त्यांनी प्रेक्षकांना विनंती करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र एका प्रेक्षकाने तिकिटाचे पैसे परत द्या आम्ही आमचा वेळ वाया घालवला आहे का, अशा शब्दात सुनावले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याची समजूत देखील काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या प्रेक्षकाने त्यांचं ऐकलं नाही. अखेर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याची घटना घडली.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीनंतर आता भाजपा देखील आक्रमक झाली आहे. "मुंब्र्यातील आधुनिक आदीलशाही मनसबदार, अफजल समर्थक आव्हाडांना तात्काळ तुरुंगात डांबा" असं म्हटलं आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी जितेंद्र आव्हाडांवर (NCP Jitendra Awhad) निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. "आव्हाड हे राजकीय दहशतवादी आणि गावगुंड आहेत, त्यांना कायद्याचा बडगा दाखवण्याची वेळ आली आहे" असं म्हटलं आहे.
"राष्ट्रीय भावनांना धक्का पोहचवल्याचा गुन्हा दाखल करून मुसक्या आवळा"
"हर हर महादेव सिनेमामध्ये अफजल खानाचा कोथळा काढलेला दाखवलाय. हे दृश्य बहुदा आव्हाडांना सहन झाले नाही. थिएटरमध्ये फक्त मारहाण केल्याचा गुन्हा पुरेसा नाही. राष्ट्रीय भावनांना धक्का पोहचवल्याचा गुन्हा दाखल करून त्यांच्या मुसक्या आवळा" असं अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (MNS Ameya Khopkar) यांनी ‘हर हर महादेव’वर आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सुरू असलेल्या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. "अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब" असं म्हणत मनसेने जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला लगावला आहे.
"अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब"
अमेय खोपकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "अफझलखाचे स्वयंघोषित प्रवक्ते आणि मुंब्रा प्रांताचे नवाब यांचे इतिहासाचे ज्ञान... आणि हे महाराजांचा इतिहास खरा काय आणि खोटा काय ते सांगत आहेत..." असं म्हटलं आहे. "अफझल खान हा जर आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी आला होता तर त्याने तुळजापूर येथील मंदिरावर हल्ला का केला??" असा सवालही त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये विचारला आहे. तसेच "शो बंद पडताय मग आमचे पैसे परत द्या अशी मागणी करणाऱ्या मराठी रसिकांना राष्ट्रवादीच्या गुंडांनी केलेली मारहाण" असं म्हणत या घटनेचा एक व्हिडीओ अमेय खोपकर यांनी शेअर केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"