राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडले. या अधिवेशनाला देशभरातून कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एंट्रीला कार्यकर्त्यांनी बॉलिवूड चित्रपटातील 'अज़ीम-ओ-शान शहंशाह' हे गाणं लावलं होतं. यावरून आता भाजपाने जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवारांवर निशाणा साधला आहे. "दिल्लीमधली 'शहंशाह' हीच खरी ओळख आहे पवार साहेबांची, राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे?"अशा शब्दांत बोचरी टीका केली आहे.
महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हँडलवरुन यावरून ट्विट करण्यात आले आहे. तसेच भाजपाने हा व्हिडिओ देखील शेअर केला असून यावरून आता राजकारण तापलं आहे. "मरहबा शरद पवार साहब! अज़ीम-ओ-शान शहंशाह... फ़ुरवा रावा, हमेशा हमेशा सलामत रहे। दिल्लीमधली 'शहंशाह' हीच खरी ओळख आहे पवार साहेबांची. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर शहंशाहचे गुणगान होत आहे. राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे?" असं भाजपाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"हे जाणते राजे नसून मुघल शहेनशाहच आहेत"
भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी देखील शरद पवारांवर यावरून टीका केली आहे. "हे जाणते राजे नसून मुघल शहेनशाहच आहेत. कोणते? ते आपल्याला माहितीच आहे" असं म्हटलं आहे. अतुल भातखळकर यांनी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट केले आहेत. "दिल्लीच्या अधिवेशनात अझीम ओ शान शहेनशाह हे गाणं वाजवलं. आम्हीही तेच म्हणत होतो हे जाणते राजे नसून मुघल शहेनशाहच आहेत. कोणते? ते आपल्याला माहितीच आहे..." असं म्हटलं आहे. तसेच "साडेतीन जिल्ह्याचे अझीम ओ शान शेहेनशाह..." असा टोलाही लगावला आहे.
"विरोधकांना सतावण्यासाठी होतोय ईडी व सीबीआय यंत्रणेचा गैरवापर"
विरोधकांना चूप करण्यासाठी मोदी सरकार ईडी व सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करीत आहे. या आव्हानांचा सामना धैर्याने करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले. मोदी सरकारच्या काळात कृषी उत्पादनात व एकूण प्रगतीमध्ये घट झाल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, यूपीएच्या काळात १५० टक्क्यांनी विकास झाला होता. हा दर सध्या केवळ ४४ टक्क्यांवर आला आहे. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून महिलांच्या सक्षमीकरणाचे भाषण करतात व त्यांच्याच राज्यात बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांवर दया दाखवितात, हा कोणता न्याय आहे, असा सवाल त्यांनी केला. चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप करून ते म्हणाले, चीनने घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.