राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेची (Congress Bharat Jodo Yatra) सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या यात्रेत पक्षाचे अनेक नेते जोडले जात आहेत. आता पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधीही या यात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेत सहभागी होण्यासाठी सोनिया गांधी (Sonia Gandhi) सोमवारी (3 ऑक्टोबर) म्हैसूरला पोहोचल्या आहेत. याच दरम्यान भाजपाने राहुल गांधींना खोचक टोला लगावला आहे.
"राहुल गांधी पंतप्रधान होणारही नाहीत, पण विको वज्रदांतीचे ब्रँड ॲम्बेसडर नक्की होतील" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रे दरम्यान राहुल गांधींनी ऊस खाल्ला. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हाच फोटो ट्विट करत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.
अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "राहुल गांधी पंतप्रधान झाले नाहीत, होणारही नाहीत, पण विको वज्रदांतीचे ब्रँड ॲम्बेसडर मात्र नक्की होतील..." असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोनिया गांधी 6 ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील मंड्या येथे भारत जोडो यात्रेत सामील होतील. प्रदीर्घ काळानंतर सोनिया गांधी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात सहभागी होत आहेत. प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांना गेल्या काही निवडणुकांमध्ये प्रचारही करता आला नव्हता.
राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून या यात्रेला सुरुवात केली. या 150 दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासात 3,500 किमीचे अंतर कापले जाणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेचा समारोप होईल. राहुल यांनी रविवारी नंजनगुड येथील प्रसिद्ध आणि प्राचीन श्रीकांतेश्वर स्वामी मंदिरात दर्शन घेतले. यानंतर, सायंकाळी त्यांनी म्हैसूर येथील एपीएमसी मैदानावर एका सभेला संबोधित केले. यावेळी मधेच जबरदस्त पाऊस सुरू झाला. मात्र, तरीही राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"