राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आजही सत्ताधारी पक्षातील आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सकाळीच कब्जा केला आणि विरोधकांच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. लक्षवेधी बाब अशी की शिंदे गटातील आमदारांकडून यावेळी शिवसेनेचे आमदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. शिंदे गटातील आमदारांकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करणारे बॅनर झळकवण्यात येत आहेत. या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा केला आहे.
भाजपानेही आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांना खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "'युवराजांची कायमच दिशा चुकली' असे पोस्टर हातात घेऊन शिंदे गटाची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी. एकदा "दिशा" चुकली की दाही दिशा फिरावे लागते" असं म्हणत अतुल भातखळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
"पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर"
"महाराष्ट्राचे परम पुज्य (प पु) युवराज...२०१४ ला १५१ चा हट्ट धरुन युती बुडवली. २०१९ ला खुर्चीसाठी हिंदुत्ववादी विचारधारा पायदळी तुडवली. पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर. पुन्हा निवडणूक लढवायची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर व दोन MLC चे लागते कुशन...खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार...जनता हे खोटे अश्रू पूसणार नाही... तुमच्या या खोट्या रडगाण्याला भूलणार नाही. युवराजांची 'दिशा' नेहमीच चुकली", अशा आशयाचा बॅनर शिंदे गटातील आमदारांनी हातात धरला आहे.
"युवराजांची दिशा नेहमीच चुकली"
शिंदे गटातील आमदारांकडून आज प्रामुख्यानं आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आलं आहे. आमदार घोषणाबाजी करत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील याठिकाणी पोहोचले आणि विधानभवनात जात असताना त्यांनी आमदारांना शांततेनं आंदोलन करा असा सल्ला दिला. त्यानंतर ते विधानभवनात गेले. आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गटातील आमदारांनी '५० खोके...मातोश्री ओके', '५० खोके...मुंबई मनपा ओके', 'युवराजांची दिशा नेहमीच चुकली', अशा घोषणा देखील दिल्या.