लातूर येथील रेल्वेच्या कारखान्यात जागतिक पातळीवरील सुसज्ज अशी ‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती होईल. त्यासाठी निविदा प्रक्रिया झाली असून नोव्हेंबरपासून निर्मिती सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी केली. अश्विनी वैष्णव म्हणाले, प्रारंभी महिन्यात तीन रेल्वे, त्यानंतर पाच रेल्वे, अशा टप्प्याटप्प्याने निर्मिती वाढविली जाईल. ‘वंदे भारत’ रेल्वे सध्या चेअर कार आहे. पुढे स्लीपर रेल्वेचीही निर्मिती केली जाईल, मराठवाड्यात जो भाग जोडलेला नाही, त्यांना ‘गती शक्ती’ योजनेंतर्गत जोडले जाईल. मराठवाड्यासाठी आवश्यक रेल्वे प्रकल्प देण्यासाठी वचनबद्ध आहे. याच दरम्यान भाजपाने यावरून शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
"कोरोना काळात जेव्हा जनाब मुख्यमंत्री घरी बसलेले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत होते याची झलक पाहा" असं म्हणत भाजपाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Shivsena Uddhav Thackeray) हल्लाबोल केला आहे. तसेच "महाराष्ट्रात न आलेले प्रकल्प अन्यत्र गेले अशी बोंब मारणाऱ्या रिकाम टेकड्या घरबशांसाठी..." असं म्हणत बोचरी टीका केली आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.
"कोविड महामारीच्या काळात जेव्हा जनाब मुख्यमंत्री घरी बसले होते तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत होते याची झलक पाहा. अवघ्या तीन वर्षापूर्वी लातूर मध्ये रेल्वे बोगीच्या कारखान्याची घोषणा झाली. तो कार्यरत ही झाला. नोव्हेंबरपासून इथे वंदे भारत एक्स्प्रेसच्या बोगी बनवणार येणार आहेत" असं म्हटलं आहे.
भाजपाच्या अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "महाराष्ट्रात न आलेले प्रकल्प अन्यत्र गेले अशी बोंब मारणाऱ्या रिकाम टेकड्या घरबशांसाठी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हा रेल्वे कारखाना म्हणजे पोटात मुरडा आणणारी बाब आहे" असं म्हणत बोचरी टीका केली आहे. भातखळकर यांनी याआधी देखील विविध मुद्यांवरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.