ठाकरे गटाने "देशाच्या लोकशाहीची ही सध्याची अवस्था आहे. हिंदुस्थानात लोकशाही मारली जात आहे असे राहुल गांधी परदेशात बोलून गेले. आता त्यांनाही देशविरोधी ठरवून किंमत मोजावी लागेल. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली आता सुरू आहेत. हे कसले लक्षण मानायचे? देशात लोकशाहीच्या नावाने ‘धमकी राज’ सुरू झाले आहे. वैफल्यावस्थेचे हे शेवटचे लक्षण असावे" असं म्हणत भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"भाजपाबरोबर युतीत असताना १८ खासदार, ५६ आमदार ईव्हीएमच्या घोटाळ्यानेच निवडून आलेले का?" असं म्हणत भाजपाने ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "भाजपा बरोबर युतीत असताना १८ खासदार आणि ५६ आमदार देखील ईव्हीएमच्या घोटाळ्यानेच निवडून आले होते का? की मुंबई महापालिकेतील पराभवाचे खापर आधीच ईव्हीएमवर फोडून शिल्लक सेनाप्रमुख मोकळे झाले आहेत?" असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
‘निवडणूक आयोग हा भाजपचा घरगडी असल्याप्रमाणेच वागत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयात निवडणूक आयोगाचे मोठेच योगदान आहे, हे आता उघड झाले आहे,’ असा आरोपही त्यांनी सामनाच्या संपादकीयमधून केला आहे.
सामनाचा अग्रलेख
‘देशाचे विद्वान गृहमंत्री अमित शहा यांनी वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानींवर अखेर तोंड उघडले आहे. अदानी यांच्या संदर्भात कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. उगाच विनाकारण आरोप करून काय उपयोग? असे सांगत केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातल्या सर्वात मोठय़ा भ्रष्टाचारास एक प्रकारे कवचकुंडलेच प्रदान केली,’ असं यात नमूद करण्यात आलं आहे.
‘शहा यांची ही विधाने म्हणजे केंद्र सरकारच्या मेंदूचा एक प्रकारे जो केमिकल लोचा झाला आहे, त्याचा पुरावा आहे. अदानी यांच्या विरोधात कोर्टात जा, असे गृहमंत्री अमित शहा सांगतात. मग यावेळी ईडी वगैरे निष्पक्ष संस्था काय करत आहेत? हाच प्रश्न आहे. अदानींच्या विरोधात लोकांनी न्यायालयात जायचे, पण त्याच वेळी कायदामंत्र्यांनी, रिजिजू यांनी न्यायालयांना जाहीरपणे धमक्या द्यायच्या. रिजिजू हे न्यायव्यवस्थेविरुद्ध बेबंदपणे बोलत आहेत,’ असं यात म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"