पुणे - आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यंदाची महापालिका निवडणूक भारतीय जनता पार्टीसाठी(BJP) आव्हानात्मक असणार आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी(Shivsena-Congress-NCP) या तिन्ही पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी बनवली आहे. राज्यात या महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांचा आहे. परंतु याबाबत अधिकृत घोषणा नाही
पण त्यात भाजपासाठी धोक्याची घंटा वाजली आहे. पुणे महापालिकेत फडणवीस सरकारच्या काळात भाजपाने एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपा नगरसेवकांची संख्या ९० च्या पुढे पोहचली होती. मात्र आगामी महापालिका निवडणूक भाजपाला जड जाण्याची शक्यता आहे. एका सर्वेक्षणातून भाजपाला पालिका निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठता येणार नाही असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हा सर्व्हे इतर कुणी नसून तर भाजपानेच केला आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच हे सर्वेक्षण करण्यात आले होतं. मोजक्याच नेत्यांना याची कल्पना होती. महापालिका निवडणुकीत भाजपाला जास्तीत जास्त ७५ ते ८० जागांवरच विजय मिळण्याची शक्यता रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आली आहे. २०१४ पासून भाजपानं राज्यात ठिकठिकाणी पाय रोवण्यास सुरूवात केली होती. पुणे महापालिकेतही मागील निवडणुकीत घवघवीत यश भाजपानं संपादन केले होते.(Pune Municipal Corporation Survey)
पुणे महापालिकेत एकूण १६४ जागा असून त्यातील ९० हून अधिक जागा जिंकत भाजपाने बहुमत सिद्ध केले होते. महापालिकेत बहुमतासाठी ८४ नगरसेवकांची गरज आहे. परंतु एकट्या भाजपाने त्यापेक्षा अधिक जागा जिंकल्याने सत्तेसाठी कुठल्याही पक्षाची मदत घेण्याची गरज भासली नाही. मात्र आता आलेल्या सर्वेक्षणातून भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी पक्ष बांधणीकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं दिसून येते.
महापालिका निवडणुकीत आघाडी होणार का? येत्या वर्षभरात १० महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्यात मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे महापालिका सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. पुणे महापालिका निवडणूक पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार तयारी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवडवर विशेष लक्ष दिले आहे. तर शिवसेनेने महाविकास आघाडी झाल्यास ८० जागा हव्यात अशी मागणी केली आहे. शिवसेना नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे जागा वाटपावरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाली तर निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
पुणे महापालिका पक्षीय बलाबलभाजपा - ९९काँग्रेस - ९राष्ट्रवादी - ४४शिवसेना - ९ मनसे - २एमआयएम - १एकूण - १६४