ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - महाराष्ट्रातील २८८ जागांपैकी भाजपाला १२० च्या आसपास जागा मिळतील असे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे उरलेल्या २४ जागांसाठी जुना मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा टेकू भाजपा घेईल की अनेक दिवस चर्चा असलेली राष्ट्रवादी - भाजप युती होईल हे लवकरच स्पष्ट होईल. अर्थात शिवसेना आपला राजकीय शत्रू नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच राष्ट्रवादीचा पाठिंबा काहीही झालं तरी घेणार नाही अशी भूमिका एकनाथ खडसे, पूनम महाजन आदींनी स्पष्ट केली आहे. मात्र नितीन गडकरी राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे व त्यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करुन मुख्यमंत्री बनण्याची शक्यता असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मनसेला अवघ्या चार ते आठ जागा मिळतील असे दिसत असल्यामुळे भाजपाला सत्तास्थापनेसाठी मनसेची फारशी मदत होणार नाही हेही उघड आहे. परिणामी भाजपला टेकु कुणाचा, शिवसेनेचा की राष्ट्रवादीचा हा प्रश्न उभा ठाकला आहे.