इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 11:00 AM2024-10-04T11:00:51+5:302024-10-04T11:02:35+5:30
पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीच्या आधी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यांनी भाजपाकडून २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती.
पुणे - पश्चिम महाराष्ट्रात समरजितसिंह घाटगे यांच्यानंतर भाजपाला आणखी एक धक्का बसणार आहे. इंदापूरातील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जात आहे. त्याप्रकारचे संकेत हर्षवर्धन पाटील यांच्या मुलांच्या व्हॉट्सअप स्टेटसनेही मिळाले आहे. हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांच्या डीपीला तुतारी असलेला फोटो झळकला, जे ठरलं तो डीपी ठेवलाय असंही सूचक वक्तव्य त्यांनी केले. आता इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यालयावरील भाजपाचं नाव आणि पक्षातील नेत्यांचे फोटोही हटवण्यात आले आहेत.
इंदापूरात हर्षवर्धन पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय होते, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोटो होतो. त्याखाली भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय असं मोठ्या अक्षरात लिहिलेले होते. मात्र शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केवळ औपचारिकता बाकी असल्याचं बोललं जाते. त्याचेच संकेत पक्ष कार्यालयावरील भाजपाचं नाव आणि नेत्यांचे फोटो हटवण्यानंतर मिळत आहेत. येत्या ६ किंवा ७ ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि आगामी निवडणुकीत तुतारी चिन्हावर निवडणूक लढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हर्षवर्धन पाटील भाजपावर नाराज का?
गुरुवारी हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईतल्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जात शरद पवारांची भेट घेतली. जवळपास १ तास या दोघांमध्ये चर्चा झाली, त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव आणि कन्या या दोघांनी त्यांच्या व्हॉट्सअपला तुतारी चिन्ह असलेला फोटो ठेवला. त्याचे फोटो व्हायरल झाले, मात्र या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी मी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करेन असं म्हटलं. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मी माझी भूमिका कळवेन असं त्यांनी सांगितले. इंदापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी हर्षवर्धन पाटील इच्छुक होते. मात्र महायुतीत ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे. त्याठिकाणी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे दादांच्या बाजूने आहेत. जिथं ज्याचा आमदार ती जागा त्या पक्षाला असा फॉर्म्युला महायुतीच्या जागावाटपात घेण्यात आला. त्यामुळे ही जागा भाजपाला मिळणार नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिली जाणार, तिथे भरणे हेच उमेदवार असतील त्यामुळेच हर्षवर्धन पाटील नाराज झाले होते.
हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरात निवडणूक लढवायची असून भाजपला जागा सुटणार नसल्याने त्यांच्यासमोर अपक्ष उभे राहायचे किंवा शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवायची हे दोन पर्याय होते. शरद पवार गटाकडेही या मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याने पाटील यांचा शरद पवार गटातील प्रवेश सोपा झाला आहे. पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीच्या आधी भाजपात प्रवेश केला होता आणि त्यांनी भाजपाकडून २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. दत्ता भरणे यांनी त्यांचा पराभव केला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भरणे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी जोर लावूनही इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना २५ हजार मतांची आघाडी मिळाली होती.