बारामती : ज्यांच्या बरोबर आम्ही संघर्ष केला. त्या विरोधकांचा सल्ला घेऊन भाजपचे नेते सरकार चालवत आहे. भाजपाने आमचा विश्वासघात केला आहे. त्यांची सत्ता देखील उलथून टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी दिला. बांदलवाडी (ता. बारामती) येथे मुख्याध्यापक माणिकराव दांगडे पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात जानकर बोलत होते. जानकर म्हणाले, सत्ता आणताना आमची मदत घेतली. आता दुसऱ्यांचे सल्ले ऐकूण निर्णय घेतले जातात. मंत्रिपदासाठी आम्ही टिका करीत नाही. आम्ही मंत्री करणारे आहोत, असे सांगून जानकर म्हणाले, राष्ट्रीय पक्षांपेक्षा प्रादेशिक पक्षांच्या माध्यमातूनच राज्याचा विकास होईल. ज्या राज्यात प्रादेशिक पक्षांची सत्ता होती, तेथे विकास झाला आहे. आता आम्ही ‘आमचे राज्य, आमचा मुख्यमंत्री’ करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. उपस्थित अन्य नेत्यांनी देखील भाजपाच्या नादी लागू नका, असा सल्ला दिला.आम्ही कोणत्याही घोटाळ्याचे धनी नाही. आम्ही चिक्की खाल्ली नाही, रस्ते घोटाळे केले नाही. त्यामुळे आम्हाला कोणाची भीती नाही. भाजपाची तर नाहीच नाही, असेही ठणकावून जानकर यांनी सांगितले. जानकर यांच्या या सडेतोड वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.(प्रतिनिधी)
भाजपने विश्वासघात केला - महादेव जानकर
By admin | Published: March 14, 2016 1:31 AM