मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मनसैनिक मोठ्या प्रमाणावर तयारीला लागले आहेत. मात्र, यातच उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी राज ठाकरे यांनी हात जोडून माफी मागावी, अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा धमकीवजा इशारा दिला आहे. यानंतर मनसेही आक्रमक झाली आहे. मात्र, ब्रिजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांना इशारा का दिला, यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. खुद्द ब्रिजभूषण सिंह यांनी याचा खुलासा केला आहे.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांसारखे लोक जन्मले, मात्र त्याच भूमीवर उत्तर भारतीयांना शिवीगाळ करणारा आणि मारहाण करणारा राज ठाकरे नावाचा व्यक्ती जन्मला. महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांसारखे लोक जन्मले आहेत. मराठ्यांनी देशासाठी पानिपतपर्यंत येऊन युद्ध केले. हा महाराष्ट्राचा एक अभिमानास्पद इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात प्रत्येक जातीचे त्यांचे विश्वासाचे लोक होते. मात्र, त्याच शिवाजी महाराजांच्या भूमीवर राज ठाकरे नावाचा व्यक्ती जन्मतो. हा व्यक्ती मराठी माणूस आणि उत्तर भारतीय असा मुद्दा निर्माण करतो, अशी ठाम भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे.
प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसाठी टॅक्सीवाल्यांना मारहाण
राज ठाकरे यांनी स्वस्तातील प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसाठी टॅक्सीवाले, विद्यार्थी यांना मारहाण केली. चित्रपट क्षेत्रातील लोकांना शिवीगाळ केली. राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर यूपी, बिहार, झारखंडच्या लोकांना शिवीगाळ करतात. राज ठाकरेंनी २००७ पासून २०२०-२१ पर्यंत योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आज त्या व्यक्तीचं ह्रदयपरिवर्तन झाले आहे. ते अयोध्येला येत आहेत, असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
राज ठाकरे अजानचा विरोध करो अथवा हनुमान चालिसा म्हणोत
महाराष्ट्रात राज ठाकरे अजानचा विरोध करोत, अथवा हनुमान चालिसाचं पठण करोत, त्याच्याशी काही घेणेदेणे नाही. माझी भूमिका पक्षाची भूमिका नाही, माझी व्यक्तिगत भूमिका आहे. मी उत्तर भारतीय आहे आणि उत्तर भारतीय म्हणून राज ठाकरे यांनी आमचा अपमान केला आहे. श्रीरामही उत्तर भारतीय होते. याच भगवान राम यांच्या वंशजांना मागील २० वर्षे सातत्याने ज्या व्यक्तीने मारहाण करण्याचे, अपमानित करण्याचे काम केले त्यांनी यासाठी माफी मागावी. त्यांनी अयोध्येत येण्याला आमचा आक्षेप नाही, अशी ठाम भूमिका ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे.