अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आणि आमदारांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्रात वर्षभरातील दुसरा भूकंप झाला आहे. दरम्यान, शिवसेनेपाठोपाठ वर्षभरातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे. आता या फोडाफोडीच्या राजकारणावरून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपाने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, आता ते महाराष्ट्र फोडतील. त्यांना विरोध करणारा कुणी नको आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ही लढाई एवढी घानेरडी आणि विकृत आहे. महाराष्ट्राबद्दल त्यांच्या मनात असलेला द्वेश आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना आपल्या सोबत नको होती. म्हणून त्यांनी शिवसेना फोडली. आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. आता ते महाराष्ट्रही फोडतील. तेव्हा विरोध करायला त्यांना कुणी नको आहे. मात्र ते आम्ही होऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
गतवर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार गेल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हही गमवावे लागले होते.