अहमदनगर - Jayant Patil on BJP ( Marathi News ) महाराष्ट्रात मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष फोडण्याचे काम गेल्या काही महिन्यात झाले. दोन्ही पक्षातल्या आमदारांना बाजूला काढून त्यांची मालकी देखील हिसकावण्यात आली. सर्व सरकारी यंत्रणा त्याला मदत करतात. ही भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वाची धोक्याची घंटा आहे असं म्हटले तर वावगे ठरणार नाही, म्हणून आपण सर्वांनी जागरुक असले पाहिजे असं सांगत माजी मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाकडून अहमदनगरच्या कर्जत जामखेड येथे विजय निश्चय मेळावा घेण्यात आला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबतीत निवडणूक आयोगाने अनपेक्षित निर्णय घेतला. जर या देशात न्याय शिल्लक राहिलेला असेल, तर पक्ष आणि चिन्ह परत आपल्याला मिळतील असा आम्हा सर्वांना आशावाद आहे. एखाद्या व्यक्तीचे काम हीच पोहोच पावती असते. त्यामुळे पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह घेऊन आपण लढू. नाणं जर खणखणीत असेल तर चिंता करण्याची गरज नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्याचसोबत मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणतीही स्पष्टता नाही. सरसकट आरक्षणाची चर्चा आता जवळपास थांबलेली आहे. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सरकार काय करत आहे? त्याबद्दल सरकारमधले कुणीही काहीच बोलत नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत काहीच चर्चा नाही. या सरकारच्या काळात महाराष्ट्रात सामाजिक अस्थैर्य निर्माण झालेले आहे, त्यासाठी आपली लढाई आहे. महाराष्ट्र अधोगतीकडे चाललेला आहे त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा या सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम होत नाही ही सामान्य लोकांची तक्रार आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आज महाराष्ट्रामध्ये राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांना राजकारणात आणण्याचे काम झालेले आहे. महाराष्ट्राचे बिहार झालेले आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याच्या पेकाटात लाथ मारण्याची भाषा वापरली जाते. मुख्यमंत्र्यांनी व दोन उपमुख्यमंत्र्यांनी यावर काही आक्षेप घेतला का?. कदाचित तुम्हाला वाटत असेल की, आपण राजकीय संकटात आहोत. पण राजकारणात असे दिवस येत असतात. तुम्ही ठामपणे शरद पवार यांच्या मागे सक्षमपणे उभे राहाल. विधानसभा व लोकसभेची जबाबदारी तुम्ही सक्षमपणे खांद्यावर पेलाल असंही जयंत पाटील यांनी आवाहन केले. त्याचसोबत कर्जत जामखेडच्या विकासाला रोहित पवारांचे योगदान मोलाचे आहे. एक युवा नेता इथल्या लोकांमध्ये समरस होतो आणि नवनवीन कल्पना मांडत लोकांचे हित जोपासतो. एक मुलगा म्हणून सर्व कुटुंब आशेने रोहित पवार यांच्याकडे पाहतात. हे त्यांचं यश आहे असंही त्यांनी म्हटलं.