ठाणे : समस्या सोडवण्यासाठी आपले प्रतिनिधी महापालिकेत जावे, या उद्देशाने ठाण्यातील व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत नशीब आजमावण्याचे ठरवले आहे. परंतु, प्रत्यक्षात त्यांनी हा निर्णय घेतला नसून त्यांचा बोलविता धनी हा भाजपाच असल्याची माहिती समोर येत आहे. काही व्यापाऱ्यांनीदेखील आम्ही भाजपाच्या बाजूने असल्याचे सांगून याला दुजोरा दिला आहे. केवळ स्टेशन परिसर, नौपाडा, घोडबंदर या भागांत शिवसेनेचा दबदबा असल्यानेच त्यांची मते फोडण्यासाठीच भाजपाने ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेना आता त्यांना कसे उत्तर देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाणे स्थानक परिसरात रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवर फेरीवाले बसू लागले असून या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी व्यापारीवर्ग पुढे आला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून फेरीवाला विरु द्ध व्यापारी असा संघर्ष सुरू झाला आहे. वारंवार तक्रारी करून फेरीवाल्यांवर केवळ थातूरमातूर कारवाई करीत आहे. शिवाय, सत्तेत असतानाही पालिकेच्या कारवाईच्या वेळेस सत्ताधारी शिवसेना व्यापाऱ्यांच्या बाजूने उभी राहिली नव्हती. त्याचे कारणही तसेच होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस हेच व्यापारी भाजपाच्या बाजूने उभे राहिले होते. त्यामुळेच शिवसेनेच्या मनात हा राग होता. त्यामुळे ज्या वेळेस व्यापारी रस्ता रुंदीकरणाची कारवाई रोखण्यासाठी शिवसेनेकडे गेले, त्या वेळेस तिनेदेखील हात वर केले. त्यामुळे भाजपाने ऐन निवडणुकीत त्यांना हाताशी धरून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा निर्णय घेतल्याचा शिवसैनिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)> स्टेशन परिसर, नौपाडा, गोखले रोड, जांभळीनाका, घोडबंदर हा परिसर शिवसेनेचे पॉकेट मानला जातो. परंतु, आता त्याच ठिकाणी व्यापाऱ्यांना मैदानात उतरवून मतांची विभागणी करून शिवसेनेला शह देण्याचा कट असल्याचे बोलले जाते. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या दहा जागा, समितीकडे त्यादृष्टीने पाहिले जात आहे.
सेनेला शह देण्यासाठी भाजपाचे व्यापारी कार्ड
By admin | Published: January 20, 2017 4:01 AM