गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेची दोन शकले झाली, या दोन्ही गटातील वादाचे पडसाद आजही उमटत आहेत. एकाच छत्राखाली असलेले शिवसैनिक दोन गटांत विखुरले गेले आहेत. कोण खरा-कोण खोटा यावरून नेत्यांमध्ये वाद होत असतानाच आता शिवसैनिकांतही गद्दारीवरून वाद सुरु झाले आहेत. मुंबईतील वाकोल्यात भाजपचा उमेदवार असूनही त्याच्या सभेनंतर शिवसेनेचे दोन गट एकमेकांना भिडल्याने वातावरण तापले होते.
मंगळवारी सायंकाळी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना गद्दार गद्दार म्हणत चिडविले. याठिकाणी भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम आणि शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे यांची सभा होती. या सभेनंतर हा राडा पहायला मिळाला आहे. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद शमविण्यात आला आहे.
वॉर्ड क्रमांक ८८ मध्ये सभा संपल्या नंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते जात होते. तेव्हा तिथे असलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना गद्दार गद्दार म्हणत डिवचले. यावरून दोन्ही गटात बाचाबाची सुरु झाली. यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. तेवढ्यात तिथे पोलीस आले आणि वाद मिटविला. ठाकरे गटाने पुन्हा असे घडणार नाही अशी हमी पोलिसांना दिली.
नाशिकमध्ये मशाल चिन्हाची मोडतोड...मुंबईतच नाही तर नाशिकमध्ये देखील दोन्ही गटात राडा झाला आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची रॅली जात असताना ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या संपर्क कार्यालयाबाहेरील मशाल चिन्हाची भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश सहाणे यांनी वाद घालत मोडतोड केली. यावरून ठाकरे गट अंबड पोलीस ठाण्यात गेला होता. तिथे सहाणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली आहे.