सोलापूर : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी अनेकांनी मुलाखती दिल्या आहेत. पण मुलाखत न देणारे आणि निवडून येऊ शकणाºयाला उमेदवारी मिळू शकते, असे भाजपचे जिल्हा निरीक्षक, वस्त्रोद्याग व पणनमंत्री प्रा. राम शिंदे सोलापुरात बोलताना सांगितले.
राम शिंदे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील एकूण ११ मतदारसंघांत ९५ जणांनी मुलाखती दिल्या आहेत. मुलाखत दिली म्हणजे उमेदवारी मिळेल, असे होत नाही. मुलाखत न घेतासुद्धा जे लोक बाजूला राहिलेत त्यांनाही उमेदवारी मिळू शकते. पण त्यांचे इलेक्टिव्ह मेरिट हवे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना विरोध होतोय की भाजपमधील लोकशाही आहे. भाजप आणि शिवसेनेची युती होणार आहे. मात्र भाजपला कोणता मतदारसंघ सोडायचा आणि शिवसेनेला कोणता सोडायचा याचा निर्णय अद्याप झालेला नाही. जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आहेत. दोनपेक्षा अधिक जागा मिळाव्यात, असा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कदम अन् मोहिते-पाटील यांच्याबद्दल शिंदे यांची भूमिका
- - प्रश्न : मोहोळचे आमदार रमेश कदम भाजपकडून इच्छुक असल्याचे सांगितले. त्यांना उमेदवारी देणार का?
- - शिंदे : त्यांना उमेदवारी मिळू शकत नाही. त्यांचे नाव आमच्याकडे आलेले नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अशा लोकांना उमेदवारी द्यायची नाही हे भाजपला कळत नाही का?
- - प्रश्न : मोहिते-पाटलांवर आरोप आहेत. त्यांना प्रवेश कसा दिला?
- - शिंदे : कुणावर गुन्हा दाखल झाला म्हणून तो आरोपी होत नाही. गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार होत नाही.
- - प्रश्न : रमेश कदमांवरील आरोप तरी कुठे सिद्ध झालेत?
- - शिंदे : पण ते जेलमध्ये आहेत.
जनतेला डावलून एन. जी. मिलचा निर्णय नाही- वस्त्रोद्योग महामंडळाने एन. जी. मिलच्या जागेवरील हेरीटेज इमारतीबद्दल राम शिंदे म्हणाले, हेरीटेज इमारतींच्या पाडकामाला स्थगिती दिलेली आहे. जनतेच्या मताला डावलून कोणताही निर्णय होणार नाही. जे लोक म्हणतील तेच इमारतींबाबत करण्यात येईल.