पश्चिम नागपूरमध्ये भाजपचा उमेदवार हिंदी की मराठी भाषिक?; नावाबाबत सस्पेन्स कायम
By योगेश पांडे | Published: October 23, 2024 09:00 PM2024-10-23T21:00:27+5:302024-10-23T21:01:25+5:30
कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष व विद्यमान आमदार विकास ठाकरे यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे. तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसमधून बडतर्फ करण्यात आलेल्या नरेंद्र जिचकार यांनी रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे.
नागपूर : पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असेल याबाबत दर दिवसाला उत्सुकता वाढत चालली आहे. येथे दोन माजी महापौरांसोबतच बरेच जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र या मतदारसंघाचे जातीय समीकरण लक्षात घेता हिंदी भाषिक उमेदवार दिला जातो की मराठी उमेदवारावर विश्वास टाकला जातो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पश्चिम नागपुरात कुणबी, हिंदी भाषिक मतदारांची संख्या लक्षणीय आहे. तसेच अनुसूचित जाती, जमाती तसेच मुस्लिम समाजाचे मतदारदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. जातीय समीकरणात बसणाऱ्या उमेदवाराला निवडून देण्याची या मतदारसंघाची परंपरा राहिली आहे. २००९, २०१४ मध्ये येथून सुधाकरराव देशमुख निवडून आले होते. मात्र २०१९ मध्ये विकास ठाकरे यांनी भाजपला जोरदार धक्का दिला. भाजप मागील पराभवाचा बदला घेण्याच्या तयारी करीत असून उमेदवारांची चाचपणी जोरात सुरू केली आहे
कॉंग्रेसकडून शहराध्यक्ष व विद्यमान आमदार विकास ठाकरे यांची उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे. तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसमधून बडतर्फ करण्यात आलेल्या नरेंद्र जिचकार यांनी रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. मात्र भाजपकडून अद्यापही या मतदारसंघातील उमेदवाराबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. माजी महापौर दयाशंकर तिवारी हे येथून उमेदवारीसाठी इच्छुक असून मध्य नागपुरातून ते काही कालावधीअगोदर या मतदारसंघात रहायलादेखील आले. तर दुसरे माजी महापौर व उपमुख्यमंत्र्यांचे मानद सचिव संदीप जोशी यांना येथून उमेदवारी मिळावी यासाठी बरेच कार्यकर्ते आग्रही असून सोशल माध्यमांवर तशा अनेक पोस्टदेखील येत आहेत. या दोघांव्यतिरिक्त नरेश बरडे यांचे नावदेखील मोठा दावेदार म्हणून काही दिवसांपासून समोर आले आहे. केव्हीआयसीचे कार्यकारी सदस्य व वरिष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता हेदेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहे. गुप्ता यांना नागपुरातील राजकारणाचा दांडगा अनुभव आहे.
महिला उमेदवारांबाबतदेखील विचार सुरू
या उमेदवारांसोबतच भाजपमधील काही महिला पदाधिकारीदेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. यात महिला मोर्चा अध्यक्षा प्रगती पाटील, डॉ.परिणिता फुके, कल्पना ग्वालबंशी, डॉ.वैशाली चोपडे, अश्विनी जिचकार, वर्षा ठाकरे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र इच्छुकांच्या गर्दीत जनतेला भावनिक साद घालणारे नाव भाजपकडून अंतिम होण्याची शक्यता जास्त आहे.