भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 02:41 PM2024-06-01T14:41:58+5:302024-06-01T15:03:06+5:30
Loksabha Election Result Prediction Before Exit Poll: मतदान संपताच सायंकाळी सहा वाजल्यानंतर वेगवेगळे चॅनल्स एक्झिट पोल दाखविण्यास सुरुवात करतील. अशातच आता काही राजकीय तज्ञांची भाकीत यायला सुरुवात झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचे आज मतदान होत आहे. मतदान संपताच सायंकाळी सहा वाजल्यानंतर वेगवेगळे चॅनल्स एक्झिट पोल दाखविण्यास सुरुवात करतील. अशातच आता काही राजकीय तज्ञांची भाकीत यायला सुरुवात झाली आहे. राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे यांनीही लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील आणि देशातील निकालावर भाकीत केले आहे.
राज्यातील लोकभावना ही मविआच्या बाजुने आहे. परंतु प्रचारावेळी काही मतदारसंघांत आघाडीच्या नेत्यांनी ज्या काही गोष्टी केल्या त्यामुळे यात बदल होण्याची शक्यता आहे. तसेच ज्या जागेवर मविआचा उमेदवार कमी ताकदीचा असेल ती जागा महायुतीच्या वाट्याला जाऊ शकते, असा अंदाज उन्हाळे यांनी व्यक्त केला आहे.
400 पार जाहीर करतान समोर लक्ष्य असाव, हा भाजपा हेतू असू शकतो. परंतु या घोषणेमुळे संविधानात बदल होईल ही शंका भाजपच्या अंगलट आल्याचेही उन्हाळे म्हणाले. गेल्या दोन निवडणुकांत भाजपचा एक मतदार तयार झाला. पंतप्रधान मोदी यांनी प्रचारावेळी जी विधाने केली त्यामुळे जनमत सतत बदलत गेल्याचेही निरीक्षण उन्हाळे यांनी नोंदविले. मुस्लिम समाजाच्या आरक्षणावरून जी विधाने केली त्यामुळे हा समाज एकगठ्ठा झाला. संविधान बदलावर विरोधकांनी जी शंका काढली त्यामुळे दलित समाजाचे मत बदलल्याचे उन्हाळे यांनी सांगितले.
मंगळसूत्र काढून घेणार, सोने काढून घेणार, महात्मा गांधी चित्रपटानंतर लोकांच्या ओळखीचे झाले आदी हास्यास्पद वक्तव्ये करण्यात आली. जनता शहाणी झाली आहे. तून भाजपाचा खरा चेहरासमोर आला, असा दावाही उन्हाळे यांनी व्यक्त केला. अखिलेश यादव, केजरीवाल आदी जिथे प्रादेशिक पक्ष ताकदवर आहेत तिथे इंडिया आघाडीने आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात 5 ते 7 टक्के मतदानाचा फरक पडला तरी मोठा फरक पडू शकतो, असेही मत उन्हाळे यांनी व्यक्त केले.
भाजपा सगळ्याठिकाणी फेल होईल असे मी म्हणणार नाही. ही निवडणूक अटी-तटीची राहील. भाजपा सर्वात मोठा पक्ष राहील. सर्व विरोधी एकत्र आल्याने त्यांचाही आवाज मोठा होईल. भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही. सत्तेच्या जवळ जातील एवढी बेगमी भाजप करेल, असेही उन्हाळे यांनी सांगितले.