Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत मंगळवारी संपली. महायुती, महाविकास आघाडीच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीत घटक पक्षांनी २८८ जागांवर आपले उमेदवार उभे केले असल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्याआधी पत्रकार परिषद घेत रमेश चेन्नीथला यांनी महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. भाजपने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला संपवल्याचा आरोप रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता प्रचाराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर टीका केली. भाजपने शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला संपवत मित्र पक्षांच्या अनेक जागा काबीज केल्याचे रमेश चेन्नीथला म्हणाले. तसेच महायुती सरकारकडून महाराष्ट्राची लूट सुरु असून विधानसभा निवडणुकीत जनता याचा बदला घेईल असा इशाराही चेन्नीथला यांनी दिला आहे. यासोबत महाविकास आघाडीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असेही चेन्नीथला यांनी बजावले आहे. ज्या उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत त्यांनाच आम्ही 'एबी' फॉर्म दिले आहेत. ज्या काँग्रेस नेत्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत, असे रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.
"सर्व २८८ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जेव्हा तुम्ही महाविकास आघाडीची तुलना महायुतीशी करता तेव्हा आमच्या गटात कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीमध्ये मात्र वाद सुरू आहेत. महायुती आता संपली आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये सर्व पक्षांना समान वागणूक दिली आहे. महायुतीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व जागा चोरल्या आहेत. यावरुन स्पष्ट होतंय की भाजपा आपल्या मित्रपक्षांना संपवत आहे. तर महाविकास आघाडीत आम्ही सर्व एकत्र आहोत," असे रमेश चेन्नीथला म्हणाले.
"आम्ही समाजवादी पक्षाशी बोलत आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणे हे आमचे उद्दिष्ट आहे आणि आम्ही या ध्येयाने काम करत आहोत. महाराष्ट्र सरकारची लाडली बेहन योजना निवडणूक आयोगाने बंद केली आहे कारण राज्य सरकारकडे पैसे नाहीत. महाराष्ट्रातील महिलांना सरकारकडून एकही पैसा मिळणार नाही. निवडणुकीपूर्वी खोटे बोलले गेले," असेही चेन्नीथला म्हणाले.