लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : लोकसभा निवडणुकीत उमेदवार ठरविण्यापासून भाजपचे अनेक निर्णय दिल्लीहून झाले, त्याचा मोठा फटका बसला ही बाब समोर आलेली असताना, आता आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांशी चर्चा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावेत, अशी भूमिका राष्ट्रीय नेतृत्वाने घेतली असल्याचे चित्र आहे.
भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक रविवारी रात्री मुंबईत झाली. केंद्रीय मंत्री आणि विधानसभा निवडणुकीसाठीचे महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत फडणवीस यांना हे अधिकार देण्यात आले. तुम्हाला निर्णय स्वातंत्र्य असेल, पण मग दमदार यशाची खात्रीही तुम्हाला द्यावी लागेल, या शब्दांत भूपेंद्र यादव यांनी यावेळी दिल्लीहून काहीही लादले जाणार नाही, याची शाश्वती दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
कोअर कमिटीत शिक्कामोर्तब
फडणवीस यांनी पक्षाचे उमदेवार महाराष्ट्रातच चार-पाच नेत्यांशी चर्चा करून ठरवावेत आणि त्या नावांना केंद्रीय नेतृत्वाची मंजुरी घ्यावी, अशी मोकळीक दिली आहे. महायुती जागावाटपाचा फॉर्म्युला आदी अधिकार फडणवीस यांना कोअर कमिटीने दिले आहेत, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी दिली.
दिल्लीतूनच यायच्या सूचना
सूत्रांनी सांगितले की, लोकसभेला प्रचाराची यंत्रणा राबविण्याबाबतच्या सूचना देखील दिल्लीहूनच यायच्या. पराभवाची कारणे जेव्हा जाणून घेतली गेली, तेव्हा हे सगळे समोर आले होते. रा. स्व. संघाच्या प्रत्येक जिल्ह्यातील यंत्रणेशी समन्वय योग्य पद्धतीने साधला गेला नाही, अशाही तक्रारी होत्या.
स्थानिक नेत्यांना डावलले...
- लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील नेत्यांनी काही उमेदवारांची नावे सुचविली होती, पण त्यांची दखल न घेता वरून उमेदवार देण्यात आले, त्याचा फटका बसला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पण अत्यंत महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनीही काही नावांना विरोध दर्शविला होता, पण कोणाचेही ऐकले गेले नाही आणि उमेदवार दिले गेले.
- तीन पक्षांमधील जागावाटप, मतदारसंघ निश्चित करणे, उमदेवार ठरविणे याबाबतही वरूनच सूचना येत होत्या, त्यामुळे जागावाटप रखडले होते.