BJP Chandrakant Patil News:मराठा आरक्षणासंदर्भातील ‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांची पूर्तता करण्यास सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले. महिनाभरात मागण्या मान्य न झाल्यास उपोषण न करता विधानसभा निवडणुकीत उतरून तुमचे उमेदवार पाडू, असा इशाराही जरांगे यांनी दिला. यातच ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. त्यामुळे ओबीसी आणि मराठा नेते आमनेसामने आल्याचे चित्र आहे. यातच भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरूनशरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजकीय स्वार्थापोटी समाजात तुकडे तुकडे पाडले जात आहेत, हे बरोबर नाही. अनेक संत महतांनी समाज एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काहीजण राजकीय स्वार्थासाठी तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकारणात तेल टाकण्याचे काम करू नका. तुम्ही देखील यात भस्म व्हाल. मराठा आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परंतु, ते न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर आधीच्या त्रुटी सुधारून दहा टक्के आरक्षण दिले गेलेे. शरद पवार हे ५० वर्षे राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू होते. तेव्हा मराठा आरक्षण का दिले नाही, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये एक बैठक घेणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी केली.
जरांगेंनी सांगितल्याप्रमाणे सरकारने सगेसोयरे अधिसूचना काढली
मनोज जरांगे पाटील पाटील यांनी सांगितले की, ब्लड रिलेशनमध्ये बसणाऱ्या कोणालाही जात पडताळणी करण्याची गरज नाही. यामध्ये काही खोट मारून ठेवली आहे. ब्लड रिलेशनशिप आणि सगेसोयरे हे एकच शब्द आहे. ते आम्ही पटवून देणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने सगेसोयरे अधिसूचना काढली. आता त्यांना नेमके काय हवे आहे हे पाहिले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शक्तीपीठासाठी राज्यात भूसंपादन होणार नाही. हा विषय संपला असून मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाच्या फीमाफीबद्दलचा शासन आदेश पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर निघेल. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढवून दिला आहे. नीट परीक्षेबाबत केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष घालावे. पण चुकीचे काहीही सहन केले जाणार नाही, असे पाटील यांनी सांगितले.