मुंबई: राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) निवडणुकीत वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यामुळे शिवसेनेत प्रवेश केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला. घोडेबाजार होऊ नये म्हणून निवडणूक लढवणार नाही. ही माघार नसून, स्वाभिमान आहे, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यानंतर आता भाजपने शिवसेनेवर टीका केली असून, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेले आव्हान स्वीकारावे. कुणी खंजीर खुपसला हे जनतेला समजेल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात 'शिव' वापरायचा नैतिक अधिकारही नाही, एखादे तथाकथित सेक्युलर नाव शोधा, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला. राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी शब्द मोडला. शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचे संभाजीराजे सांगताहेत. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल? संभाजीराजेही खोटे बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणे कुठल्या सभ्यतेत बसते, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली.
मनसेनेही साधला शिवसेनेवर निशाणा
मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. छत्रपतींच्या वंशजाला दुःखी आणि व्यथित होऊन बोलताना पाहणे वेदनादायक होते. उठता बसता महाराजांचे नाव घेणाऱ्या मात्र वागण्यात खोटारडापणा करणाऱ्यांना आता पक्षाच्या नावात "शिव" वापरायची लायकी नाही असेच म्हणावे लागेल. आदरणीय बाळासाहेब जिथून कुठून पाहत असतील त्यांनाही अश्रू आवरले नसावेत, अशी घणाघाती टीका गजानन काळे यांनी केले आहे.
दरम्यान, शिवसेनेत प्रवेश करा तुम्हाला खासदार करू असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. परंतु, मी प्रवेश करणार नाही स्पष्ट सांगितले. माझी उमेदवारी ही घोडेबाजारासाठी नव्हती. सगळ्या पक्षातील लोकांनी मला मदत करावी. निष्कलंक माझे व्यक्तिमत्व आहे. मला कुठल्याही पक्षाचा द्वेष नाही. मला सगळी गणिती माहिती होती. पुढचा प्रवास खडतर होता याची जाणीव होती. मला शिवसेना खासदारांचे फोन आले. सगळ्या अपक्ष आमदारांवर दबाव होता. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, असा गौप्यस्फोट संभाजीराजे यांनी केला.