मुंबई - उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सय्यद यांनी थेट रश्मी ठाकरे, संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यामुळे दिपाली सय्यद या शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करतील हे निश्चित झाले होते. मी एकनाथ शिंदे यांच्यामुळेच शिवसेनेत आले होते असं सय्यद यांनी म्हटलं होतं. परंतु दिपाली सय्यद यांचा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात पक्षप्रवेश रखडला आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
यावर भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेनेनं काय करावं यावर भाजपानं जास्तीत जास्त मत व्यक्त करावं. विरोध करण्याचं कारण नाही. पण इतक्या वेगाने घटना घडतायेत. त्यामुळे मी इतका अलर्ट नाही. दिपाली सय्यद का येतायेत कुणाच्या आग्रहाने येतायेत. कुणाचा विरोध आहे हे सर्व बघितल्यावर मी यावर बोलेन असं सांगत त्यांनी सय्यद यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य केले आहे.
दिपाली सय्यद पक्षप्रवेश रखडला
दिपाली सय्यद या आज ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात पक्षप्रवेश करणार होत्या. परंतु ऐनवेळी हा पक्षप्रवेश रद्द झाल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांनी दिपाली सय्यद यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर विरोध करत आधी माफी मागावी अशी मागणी लावून धरली आहे. त्यात प्रदेश महिला जनरल सेक्रेटरी दिपाली मोकाशी, ठाण्यातील माजी नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेबाबत नाराजी व्यक्त केली.
याबाबत दिपाली मोकाशी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिपाली सय्यद यांनी खालच्या शब्दात टीका केली होती. त्याचसोबत मविआ सरकार काळात सय्यद यांनी भाजपा महिला आघाडीच्या नेत्यांविरोधात खोटी तक्रार दिली होती. आमचा सय्यद यांच्या पक्षप्रवेशाला विरोध नाही. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल तर त्यांनी भाजपा नेत्यांची माफी मागावी आणि महिला आघाडीच्या नेत्यांविरोधातील खोटी तक्रार मागे घ्यावी असं त्यांनी सांगितले. सुषमा अंधारे यांनी लगावला टोला सत्तास्थानी प्रवेश करणे सोप्पे असते. कारण तिकडे करिअर फार लवकर होते. कदाचित आज ठाकरे यांच्या शिवसेनेचा संक्रमण काळ आहे. आम्ही सगळ्यांनी लढायचं ठरवलं आहे. त्यामुळे जे जातात त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही आमच्या म्हणण्यावर ठाम आहोत असं सांगत सुषमा अंधारे यांनी दिपाली सय्यद यांना टोला लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"