BJP Chandrakant Patil News: अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले. दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अजित पवारांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला असून, याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू आहे. मात्र, यातच दिवाळीच्या सणानिमित्त अजित पवार कुटुंबाच्या कार्यक्रमात सहभाग घेणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा झाल्याचे दिसले. मात्र, अखेरीस अजित पवार कुटुंबाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे म्हटले जात आहे. यावरून भाजप नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिवाळी पाडव्यानिमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. बारामतीतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी दिवाळी पाडवा साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार की नाही यावर जोरदार चर्चा होती. मात्र, संध्याकाळी उशिरा अजितदादा गोविंदबागेत गेल्याचे सांगितले जाते. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय चुली वेगळ्या असल्या तरी पवार कुटुंब एकत्र असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे, असे म्हटले जात आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले.
सणासुदीला एकत्र येणे पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य, पण...
कितीही मतभेद झाले तरी सणासुदीला एकत्र येणे हेच पवार कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे. मतभेदानंतर पवार कुटुंब वेगळे होते. पण अशा कार्यक्रमाला नक्की एकत्र येतात. पवार कुटुंब एकत्रित आले म्हणून मागचे मतभेद विसरले असे नाही. मतभेद अजूनही तसेच आहेत. अजित पवार गोविंद बागेत जाणारच असतात. ते जातात. दोन मोठे पवार जे आहेत अजित पवार आणि शरद पवार त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे, हे घटना घडल्याशिवाय कळत नाही, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचा तिसऱ्या टप्प्यातील राज्यव्यापी दौरा करत आहेत. यावर बोलताना, आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष असताना अनेक वेळा बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील भेटले आहेत. सध्या अनेक समाजाच्या मनात तिरस्कार निर्माण होत आहे. सर्व समाजाच्या नेत्यांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे. समाजामध्ये तेढ निर्माण करणे आपले काम नाही. मराठा समाजाला तीन टप्प्यात आरक्षण मिळण्याची प्रोसेस सुरू आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.