मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ठाण्यातील उत्तरसभाही चांगलीच गाजल्याचे दिसत आहे. मनसेच्या पाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणावर राजकीय वर्तुळातून येणारा प्रतिक्रियांचा ओघ सुरू असतानाच राज ठाकरे यांनी ठाण्यात दुसरी सभा घेत पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून सरकारला अल्टिमेटम दिला आहे. यावर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपांची धार वाढताना दिसत आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर भाष्य केले आहे.
खोटे पसरवण्यासाठी महाविकास आघाडीने इको सिस्टिम सुरू केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे वेगवेगळे नेते समान खोटे बोलून ते खरे कसे आहे हे जनतेला भासवून देण्याचा प्रयत्न या इको-सिस्टिमच्या माध्यमातून करत आहेत, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व
राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यानंतर मनसे भाजपाची बी टीम असल्याचे खोटे महाविकास आघाडी आपल्या इको-सिस्टिमच्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून ते कधीही कोणाची बी टीम म्हणून काम करणार नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच हिंदुत्वाचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. परंतु, भाजपला नव्याने घेण्याची गरज नाही, कारण सुरूवातीपासून भाजपच तो प्रमुख मुद्दा राहिला आहे. आजतागयत हिंदुत्वाचे अनेक मुद्दे भाजपने प्रखरपणे मांडले आहेत. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आहे
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला होता. आमचे हिंदुत्व वचन पूर्ण करण्याचे आणि सेवा करण्याचे आहे. मनसेला टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरे वाटतेय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडे काम मिळाले आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले होते.