Maharashtra Politics: भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. याचा राग मनात धरून काही कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शाईफेकीच्या घटनेचा निषेध केला असला, तरी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्रही सोडले आहे. यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनीही पलटवार केला असून, पवारांना डायरेक्ट चॅलेंज करणार, सर्व प्रकरणे बाहेर काढणार, असा थेट इशारा दिला आहे.
सरकार गेल्यामुळे पोटशूळ उठला आहे. आम्ही घाबरणारी माणसे नाही. विद्यार्थी परिषदेचे काम करण्यासाठी १३ वर्ष घराबाहेर राहिलो आहे. अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. रामजन्मभूमीचे आंदोलन, फी-वाढ विरोधी आंदोलनात उतरलो आहे. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, यासाठी मी संघर्ष केला, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रोहित पवारांनी केलेल्या एका ट्विटबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला.
पवारांना डायरेक्ट चॅलेंज करणार, सर्व प्रकरणे बाहेर काढणार
रोहित पवारांना बाबासाहेब आंबेडकर वाचून माझ्याकडे यायला सांगा. मी वाचलेत बाबासाहेब. रोहित पवार, तुझ्यासारखा घरातील राजकीय परंपरेने मोठा झालेलो नाही. चळवळीतून मोठा झालेलो आहे. एका गिरणी कामगाराचा मुलगा आम्हाला डायरेक्ट चॅलेंज करतो, हे पवारांच्या पोटात खुपतेय. पवारांना डायरेक्ट चॅलेंज करणार. सर्व प्रकरणे बाहेर काढणार, असा थेट इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
दरम्यान, माझी कोणाविषयी कोणतीही तक्रार नाही. तसेच ज्या कोणाला कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे त्यांची मुक्तता करावी, ज्या पोलिस अधिकाऱ्यांवर व पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे ती ही मागे घ्यावी. तसेच जर पत्रकारांवर कारवाई करण्यात आली असल्यास तीही मागे घ्यावी,अशी सूचना करतो आहे. माझ्या तोंडावर ज्यांनी शाईफेक केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही. माझ्या दृष्टीने ह्या वादावर मी पडदा टाकत आहे. आता हा वाद थांबवावा ही विनंती, असे पत्र चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"