मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या ठिकाणांवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. यासंदर्भात ईडीने कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. ईडीने केलेल्या कारवाईवर बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांसह (Kirit Somaiya) भाजपवर सडकून टीका केली. यावेळी संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया देताना, संजय राऊतांची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसते का, अशी विचारणा केली आहे.
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर हल्लाबोल करताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. किरीट सोमय्या चु*** आहे. महाराष्ट्रद्वेष्टा आहे. जो माणूस मराठीच्या विरोधात कोर्टात जातो, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? कोण आहे तो? मी तुमच्या बापाला घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.
त्यांना जे संस्कार आहेत, त्यानुसार ते बोलतात
संजय राऊत आज जे म्हणाले, त्यात नवीन काय? त्यांना जे संस्कार आहेत, त्यानुसार ते बोलतात. गेल्या दोन अडीच वर्षांत रोज ते शिव्या देत आहेत. त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या भाषेची अपेक्षा आहे. त्यांनी वापरलेल्या शब्दांचं एक पुस्तक तयार करायचं काम मी एकाला दिलं आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला विचारणार आहे, ‘उखडणार आहेत का?’ ‘भिकारडे’ हे शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसतात का, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली.
गोपीचंद पडळकर एकदाही पवारांवर बोलले नाहीत
एरवी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केले जाते की, तुमची भाषा सांभाळा वगैरे. एक गोपीचंद पडळकर कधी बोलले, तर आम्ही त्याला ताबडतोब सांगतो की काय बोलायचे ते नीट बोलायचे. आपली संस्कृती सोडायची नाही. त्यानंतर गोपीचंद पडळकर एकदाही पवारांवर बोलले नाहीत. पण संजय राऊतांनी हे बोलणे काही नवीन नाही. माझ्याबद्दल तर ते इतके बोलले आहेत, या शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.