मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल आज जे वर्णन केले आहे तशी गंभीर स्थिती महाराष्ट्रात असून त्याबद्दल चर्चा करण्यासाठी लोकसभेचे नव्हे तर विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी आपल्या राज्य सरकारला द्यावा, असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी सोमवारी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोरोनाच्या साथीबद्दल बोलताना बेड नाहीत, ऑक्सिजन नाही आणि लसीकरणही नाही, नुसता गोंधळ आहे, असे ट्वीट आज सकाळी केले आहे. ही अभूतपूर्व स्थिती आहे आणि युद्धजन्य परिस्थिती आहे, सगळीकडे नुसता गोंधळ आणि तणाव आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे म्हणणे अचूक आहे पण ते महाराष्ट्राच्या स्थितीचे वर्णन आहे. संपूर्ण देशात अशी स्थिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चर्चा करायला थेट लोकसभेचे अधिवेशन बोलावण्याची त्यांची सूचना सध्या तरी योग्य नाही असं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असती तर तसे करणे योग्य झाले असते. सध्या तरी महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करणे योग्य होईल. संजय राऊत हे शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचे एक शिल्पकार आणि या सरकारचे आवाज आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या सरकारला या प्रमाणे विशेष अधिवेशनाचा सल्ला द्यावा असं पाटील यांनी म्हटलं आहे.
"लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा", चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लॉकडाऊन हा एकच पर्याय नाही. त्यापेक्षा आरोग्य यंत्रणेसाठी पायाभूत सुविधा वाढविणे आणि प्रभावी उपाययोजानांवर अधिकाधिक भर द्या, अशी मागणी काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्हिडीओ क्लिपद्वारे केली होती. तसेच, यामध्ये स्वयंसेवी संस्थांची देखील मदत घ्यावी, अशी सूचना पाटील यांनी केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वच जण चिंतेत आहेत. केवळ आठ दिवस किंवा पंधरा दिवसाच्या लॉकडाऊनमुळे तो संपणार नाही आहे. लॉकडाऊनमुळे त्याचे प्रमाण कमी होईल. पण तो समूळ नष्ट होणार नाही. त्यामुळे तात्पुरता लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लागू करण्यासह प्रदीर्घकालीन उपाययोजनांवर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणांसाठी पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात पुरविल्या पाहिजेत असं पाटील यांनी म्हटलं होतं.