Maharashtra Politics: कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. जवळपास २५ वर्षांहून अधिक काळ भाजपचे या ठिकाणी वर्चस्व होते. मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारत भाजपला मोठा धक्का दिला. मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली होती. टिळक कुटुंबीयांना तिकीट न दिल्यावरून भाजपवर टीकाही करण्यात आली होती. मात्र, यातच आता चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली असून, टिळक कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता. आजारपणामुळे मुक्ताताईंचे मतदारसंघातील दिसणे, असणे, अस्तित्व हे संपले होते. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा यांना मुक्ताताईंच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला, त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. त्यामुळे टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. यावर मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याशी सहमत नाही
पुण्यात पक्ष कुठे नसताना पक्ष वाढवण्यासाठी मुक्ता टिळक फिरल्या. त्यांच्या कामाचा मान त्यांनी राखायला हवा होता. आम्ही चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याशी सहमत नाही, असे कुणाल टिळक यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यला महत्त्व आहे. त्यांना कोण चुकीची माहिती देते आहे, असा प्रश्न पडला आहे. मुक्ता टिळक यांचे काम होते त्यामुळे सहानुभूतीची लाट होती. मुक्ताताई आजारी असतानाही मतदारसंघात ते कार्यक्रम घेत होते. त्यांचे २० ते २५ वर्ष काम होते आणि त्या कामामुळे लोकांचा संपर्क कायम होता, असे कुणाल टिळक यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपत आता कोणतीही मरगळ नाही. पुणे महापालिकेत १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील. तसेच पुढच्या वेळेस कसब्यात वेगळे चित्र दिसेल, असा दावा कुणाल टिळक यांनी केला. कसबा पेठेत उमेदवार निवडताना आमची चूक झाल्याचे संजय काकडे यांनी मान्य केले होते. आमचे उमेदवार हेमंत रासने यांनीही हे मान्य केल्याचे त्यांनी सांगितले होते. पुढील विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना टक्कर देणारा उमेदवार देऊ अन् पुन्हा हा गड भाजपकडे येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"