Bypoll Election 2023: कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ही पोटनिवडणूक भाजपला बिनविरोध करायची होती. मात्र, महाविकास आघाडीचे नेते उमेदवार देण्यावर ठाम राहिले. आता या दोन्ही ठिकाणी निवडणुका होणार आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा करण्यात आला असून, प्रचाराला जोर चढल्याचे दिसत आहे. यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मत म्हणजे विकास थांबवणे. दोन्ही पक्षांनी केवळ मतांचे राजकारण केले, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. दोन्ही जागांसाठी भाजपच्या मॅरेथॉन बैठका सुरू असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मत म्हणजे विकास थांबवणे. दोन्ही पक्षांनी केवळ स्वतःसाठी मतांचे राजकारण केले आहे. देशाच्या विकासाठी त्यांनी कधीच राजकारण केले नाही, त्यांना विचारधारा नाही. भाजपची विचारधारा पक्की असून, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात दिलासादायक बजेट येईल
महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत. ते चांगले काम करत आहेत. महाराष्ट्रात दिलासादायक बजेट येईल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. तसेच शिंदे आणि फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दिवंगत लक्ष्मण जगताप हे कामे करीत होते. ते आता आपल्यात नाहीत. उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या त्यांचे स्वप्न पूर्ण करतील. त्यासाठी त्यांना विजयी करा, असे आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या विधानावर बोलताना, खोट बोलून राजकारण करणे हा देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव नाही. तसेच जे घडले असेल तेच त्यांनी सांगितले असणार. देवेंद्र फडणवीसांना अनेक वर्षांपासून ओळखतो, देवेंद्र फडणवीस राजकारणाकरिता स्वतःची खुर्ची वाचविण्याकरिता किंवा खुर्ची मिळविण्याकरिता कधीच असत्य कथन करीत नाही. देवेंद्र फडणवीस यांचे परिणामी अनेक वेळा नुकसान झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दगा झाला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"