Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रात आली आहे. पुढील काही दिवस ही यात्रा महाराष्ट्रात असणार आहे. या यात्रेला अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधला. काँग्रेसच्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. त्याचवेळी महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. याचे आत्मचिंतन करावे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
काँग्रेसची भारत जोडो यात्रा बघितली, तर या यात्रेत नेत्यांच्या मुलांना समोर केले जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत. अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश घेत आहेत. नंदुरबार, भिवंडी, मिरा-भाईंदर, ठाणे येथील काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राहुल गांधीसारखे नेते महाराष्ट्रात असताना काँग्रेसचे खालचे कार्यकर्ते भाजपात का प्रवेश करत आहेत? याचे आत्मचिंतन काँग्रेसने केले पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
खर्च होणारा पैसा नेमका कोणाच्या खात्यातून खर्च होतो आहे?
महाराष्ट्रात भारत जोडो यात्रेचा प्रवेश झाला आहे. या यात्रेत मोठ्या नेत्यांनी त्यांच्या मुलांना समोर केले आहे. यासाठी खर्च होणारा पैसा नेमका कोणाच्या खात्यातून खर्च होतो आहे? केंद्रीय काँग्रेसच्या खात्यातून खर्च होतोय की महाराष्ट्र काँग्रेसच्या खात्यातून खर्च होतो आहे? हा पैसा जो खर्च होतो आहे, तो अडीच वर्षात महाविकास आघाडीने भ्रष्टाचारातून कमावलेल्या पैशांमधून होतो आहे. सरकारमधून भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारातून सरकार हा काँग्रेसचा नेहमीचा अजेंडा आहे, असा मोठा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे हे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री आणि एका महत्त्वाच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना हे वक्तव्य शोभत नाही. ज्या यात्रेच्या नावात भारत जोडो असा शब्द आहे आणि राहुल गांधींनी ज्या उद्देशाने ही यात्रा सुरू केली आहे, ते सर्वांनाच माहिती आहे. देशात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. गोरगरिबांना, तरुणांना न्याय मिळावा, या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आली आहे. बावनकुळेंनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलणे म्हणजे चेष्ठा आहे. राफेलपासून जीएसटीपर्यंत अनेक प्रकरणे आहेत, ज्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, या शब्दांत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"