Maratha Reservation: जालना जिल्ह्यालीत आंतरवाली येथे मराठा आरक्षणाची मागणी करण्यासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्यात उमटत आहेत. यानंतर मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झाले आहे. ठिकठिकाणी आंदोलकांकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अनेक नेते जालना येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करून दुसऱ्या समाजाला आरक्षण देणे हे योग्य नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यावेच पण, त्यावेळेस सामाजिक आर्थिक, सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने केले होते त्या सर्वेक्षणाप्रमाणे पुढे कसे जाता येईल आणि मराठा समाजाला न्याय कसा देता येईल याबाबत सरकार सकारात्मक विचार गरजेचा आहे. विजय वडेट्टीवार यांची भूमिका योग्य नाही. राजकारणापोटी त्यांचा स्तर खाली गेला आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
भाजपचा मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा आहे
ओबीसींमधून आरक्षण द्या, अशी मागणी काँग्रेस विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती. यावर बोलताना, विजय वडेट्टीवार यांची मागणी योग्य नाही. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. वेगळी टक्केवारी केली पाहिजे. त्याकरिता नियमाप्रमाणे सर्व केले पाहिजे. मात्र, ओबीसी आरक्षण काढून मराठा समाजाला द्या ही मागणी योग्य नाही. यामुळे दोन्ही समाजात वाद निर्माण होतील. भाजपचा मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यास महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे नापास झाले. शरद पवार यांनी तेव्हा त्या सरकारला सांगायला पाहिजे होते की, जेष्ठ वकील लावा पण त्यांनी ते केले नाही. त्यामुळेच मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी जबाबदार आहे, या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला.